Mumbai Corona Vaccination | मुंबईत एक लाख कोरोना लसीचा साठा दाखल, 45 वर्षांवरील वयोगटाचं लसीकरण होणार
मुंबईत 45 वर्षांवरील वयोगटाचं लसीकरण पुन्हा सुरु होणार आहे. कारण मुंबई महापालिकेला एक लाख लसीचा साठा मिळाला आहे. तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.
मुंबई : कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुमारे एक लाख लसींचा साठा दाखल झाला आहे. बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार लसीचा हा साठा 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत 45 वर्ष तसंच त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.
Brihanmumbai Municipal Corporation received a fresh stock of 1 lakh vaccine doses last night and it will resume vaccination of people above 45 years at its and govt’s vaccination centres: BMC pic.twitter.com/nQlpHhdGhx
— ANI (@ANI) May 5, 2021
45 वर्ष आणि त्यावरील वयोगटामधील पात्र नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्यांनी कोविन अॅपमध्ये नोंदणी केलेली असणं बंधनकारक आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डोससाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचं लसीकरण करताना 80 टक्के नोंदणीकृत तर 20 टक्के थेट येणाऱ्या नागरिकांना सामावून घेण्याचं नियोजन आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं पाच केंद्रांवर लसीकरण
दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, मुंबई महापालिकेच्या ठरवून दिलेल्या पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचं सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.
या पाच लसीकरण केंद्रांची नावे
1. बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर