BMC : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली होणार, बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
Iqbal Singh Chahal : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली होणं अटळ आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
BMC Commissioner Transfer : मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली होणार आहे. बदली रोखण्यासाठी राज्य सरकारनं (Maharashtra Government) केलेली मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने (Election Commission) फेटाळली आहे. त्यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कराव्याच लागणार आहेत.
मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली अटळ
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला होता. या आदेशामुळे मुंबई चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. दरम्यान, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारने सोमवारी यासंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र, मंगळवारी आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आता मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची बदली होणं अटळ आहे.
निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश
तीन वर्षे आणि त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही पालिकांमधील अतिरिक्त आयुक्तांची बदली राज्य सरकारला करावीच लागेल.