(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचं आजपासून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा करणार मार्गदर्शन
नवी मुंबईत 15 आणि 16 फेब्रुवारीला भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. भाजपच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
नवी मुंबई : राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. नवी मुंबईत दोन दिवस म्हणजे 15 आणि 16 फेब्रुवारीला हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या राज्यव्यापी अधिवेशनाला 10 हजारहून अधिक भाजप पदाधिकारी सामील होतील, असा दावा भाजपने केला आहे.
सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याहस्ते ध्वजारोहन होईल आणि अधिवेशनाल सुरुवात होईल. त्यानंतर जे पी नड्डा उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. चंद्रकांत पाटील आजच भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारतील.
भाजपच्या या राज्यव्यापी अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात दोन प्रस्ताव पास होणार आहेत. यामध्ये, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला राज्यातील जनतेने कौल दिला. मात्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. या सरकारच्या 80 दिवसांच्या कामकाजाचा पंचनामा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कशाप्रकारे जनतेची फसवणूक केली, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये श्रीराम मंदिर ट्रस्टची स्थापना, नागरिकत्व दुरुस्ती कायदा यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. या सर्व निर्णयांना समर्थन दिलं जाणार आहे. हे दोन प्रमुख दोन प्रस्ताव पास केले जाणार आहेत.