मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. त्यवरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या वॉर्निंगलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावं, असंही ते म्हणाले आहेत.


मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, 'ठाकरे सरकार हे भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार आहे. मुख्यमंत्री यांनी मला मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत.'


किरीट सोमय्या आरोप करताना म्हणाले की, "ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन 2 कोटी 55 लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली होती, ती 900 कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील 354 कोटी आधीच देण्यात आलेले आहेत."


पाहा व्हिडीओ : ठाकरेंनी 5 पैकी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं; किरीट सोमय्या यांचं आव्हान



"दहिसर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही जमीन घोटाळ्याची कागदपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या घोटाळ्याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल केली होती. यांतर राज्यपालांकडून लोकायुक्तांना चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवसेनेमध्ये हिंमत नाही म्हणून ते विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 40 जमिनी खरेदी केल्यात हे या कागदपत्रांवरून दिसत आहे. त्यातील 30 जमिनींच्या सातबारावर अन्वय नाईक कुटुंबियांचं नावही आहे.", असं किरीट सोमय्या म्हणाले.


पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "दहिसर भूखंड घोटाळ्याची सादर केलेली कागदपत्रं खरी आहेत. जर मी सादर केलेली कागदपत्र खोटी निघाली तर माझ्या विरोधात पोलिसांत जा. मी कारवाईसाठी तयार आहे. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही, हेच मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तरं देण्याची हिंमतच नाही, म्हणूनच ते शिवीगाळ करतात."


किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषेद आरोप करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए आणि मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. एवढंच नाही तर महापौरांनी बनावट सह्या करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे."


महत्त्वाच्या बातम्या :