मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबियासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांना इशारा दिला आहे. तुम्ही जे आरोप करताय ते सर्व बिनबुडाचे आहेत. त्यामुळे जे आरोप करताय ते सिद्ध करा, अन्यथा आरोप करू नका असं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे.
संजय राऊत म्हणाले की, 'खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा, हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगणार नाहीत. मुळात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण आहे. त्यावर मी बोलत नाही. पण एक आमची मराठी भगिनी, तिचं कुंकू पुसलं गेलं. त्या स्वतः आणि त्यांची कन्या. या गेल्या अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्यावर हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी, प्रवक्ते बोलायला तयार नाहीत. आणि आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळी तपासाची दिशा भरकटून टाकण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते हे असे मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.'
'म्हणजे त्या बाईचं कुंकू पुसलं तरी चालेल...? आणि कोणत्या जमिनींचे व्यवहार? काय माहित आहे या माणसाला? हा कोण आहे? एक कायदेशीर व्यवहार आहे. 2014 साली झालेला. त्यासाठी हातामध्ये कागद घेऊन फडफडतोय हा गिधाडासारखा. कोण आहे हा माणूस? मराठी माणसाने केलेला व्यवहार आहे हा. यांच्या डोळ्यांमध्ये खुपतोय का? म्हणे, 21 व्यवहार केले, दाखवावे. हा खोटारडेपणाचा कळस आहे.' असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'एक लक्षात घ्या की, ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार हे पाच वर्षचं चालणार आहे.'
संजय राऊत म्हणाले की, 'आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. आमची भूमिका त्यांच्या पतीला ज्यांनी आत्महत्या देण्यासाठी प्रवृत्त केलं त्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षा देण्याची आहे. पण शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. म्हणूनच ते अशाप्रकराची फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड करू द्या. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या व्यवहाराला भ्रष्ट्राचार, भ्रष्ट्राचार बोंबलतायत. ते रोज सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहतात. स्वतःकडे पाहून त्यांना वाटतं भ्रष्ट्राचार झाला. ते म्हणतील आरशातही भ्रष्ट्राचार आहे. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुरूंगात जाताय. आकांडतांडव करताय. कोण तुमचा लागतोय तो? हे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे.'
महत्त्वाच्या बातम्या :