एक्स्प्लोर
मोदींचे मास्क घालून बाईक रॅली, लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी
दोन मार्चला देशभरात एकाच वेळी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. भगवे झेंडे घेऊन प्रत्येक मतदारसंघातून हजार ते दीड हजार कार्यकर्ते मोदी मास्क घालून रॅली काढणार आहेत.

मुंबई : राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घोषणा दिली आणि भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली. महाराष्ट्रात युतीचं भवितव्य अद्याप अधांतरी असलं, तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुढच्या दीड महिन्यात स्वबळावर प्रचाराची नेट प्रॅक्टिस सुरु केली जाणार आहे. 2019 च्या निवडणुकीला सामोरे जाताना तळाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने सुरु केली आहे. देशभरात लोकसभा निवडणुका टप्याटप्यांमध्ये होणार आहेत. मात्र भाजपशासित सर्व राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी प्रचार करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. दोन मार्चला देशभरात एकाच वेळी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. भगवे झेंडे घेऊन प्रत्येक मतदारसंघातून हजार ते दीड हजार बाईक्स निघणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात 300 ते 350 बूथ असून त्यातून प्रत्येकी पाच बाईक्स निघतील. मोदी मास्क घालून कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. कमळाच्या पणतीचे दिवे यावेळी घरोघरी वाटले जाणार आहेत. विशेष म्हणजे सॅटेलाईट इमेजेसने भारताचं चित्र टिपलं जाणार आहे. पन्ना प्रमुखांची नियुक्ती : प्रत्येक बूथमध्ये 25 पन्नाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार असून प्रत्येकाकडे 50 ते 60 मतदारांची जबाबदारी देण्यात येणार आहे. मतदारांना संपर्क साधण्याचं काम त्यांच्याकडे सुपूर्द केलं जाणार आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नवीन मतदारांची नावं जोडणे, स्थलांतरित किंवा निधन झालेल्या व्यक्तींची नावं तपासणं, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणं यासारखी कामं त्यांना करावी लागतील. संघटनात्मक नेमणुका : एका राज्यात पाच सरचिटणीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक सरचिटणीसाला एका कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. 2014 च्या निवडणुकीत हाय टेक प्रचार करुन आणि मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने देशात सत्ता आणली. मात्र विरोधकांची वाढती ताकद भाजपसाठी या निवडणुकीत डोकेदुखी ठरणार हे नक्की. त्यामुळे 2019 च्या रणधुमाळीत भाजपला गड राखणं आव्हानात्मकच ठरणार आहे.
आणखी वाचा























