पाच वर्षांपूर्वी भावाला मारहाण केल्याच्या रागातून भिवंडीत चिकन शॉप मालकावर चॉपरने सपासप वार; थरार सीसीटीव्हीत कैद
भिवंडीत (Bhiwandi News Updates) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वी भावाला केलेल्या मारहाणीचा बदला एकानं घेतला आहे.
Bhiwandi Crime : भिवंडीत (bhiwandi News Updates) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वी भावाला केलेल्या मारहाणीचा बदला एकानं घेतला आहे. चिकन शॉपचा मालक आणि त्याच्या मित्राने हल्लेखोराच्या मोठ्या भावाला पाच वर्षीपूर्वी मारहाण केली होती. याच रागातून हल्लेखोराने मुंबई नाशिक महामार्गवरील एका हॉटेलसमोरच चिकन शॉपच्या मालकावर चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. भावेश वामन बेलवले (रा. डोहाळेगाव, भिवंडी) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर बिलाल मोहंमद शेख (22) असे हल्यात जखमी झालेल्या चिकन शॉप मालकाचं नाव आहे.
जखमी बिलाल हा भिवंडी तालुक्यातील वडवली गावात कुटूंबासह राहतो. त्याचे सापे गाव येथे चिकन शॉप आहे. त्यातच बिलाल हा मित्रासह मुंबई - नाशिक महामार्गवरील सागर ईन या हॉटेलमध्ये 18 जानेवारी रोजी रात्रीच्या जेवणासाठी आला होता. त्यावेळी हल्लेखोर भावेश हाही याच हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्याच सुमारास बिलाल जेवणाचं बिल देण्यासाठी हॉटेलच्या गल्ल्यावर येताच पाठमागून हल्लेखोर भावेशने त्याच्या कमरेत चॉपर खुपसला, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिलाल जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या आवारात आला. इथेही त्याच्यावर चॉपरने हल्लेखोर भावेशने सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी हा पडला असता, तेवढ्यात त्याच्या मित्राने भरधाव कार हल्लेखोराच्या दिशेनं आणल्याने तो बाजूला झाला. हे पाहताच कार मधून सर्फराज याने बिलाल याला घेऊन पडघा ग्रामीण रुग्णालयात गाठले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 19 जानेवारी रोजी बिलाल शुद्धीवर आल्यानंतर त्याने पडघा पोलिसांना जबाब देऊन हल्लेखोर भावेश विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, तक्रारीत बिलाल याने नमूद केले कि, हल्लखोर भावेशचा मोठा अमोल याला पाच वर्षांपूर्वी बिलाल आणि त्याचा मित्र हरिषने मारहाण केली होती. तेव्हापासून मारहाणीचा राग मनात धरून भावेश हा बिलाल याला मारण्यासाठी टपून बसला होता. सध्या बिलालवर भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पडघा पोलिसांनी हल्लेखोर भावेशचा शोध घेऊन त्याला 20 जानेवारी रोजी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.