Bhandup Fire | रुग्णालयात दाखल केलेल्या वडिलांचा शोध घेणाऱ्या लेकीला पाहून हेलावलं साऱ्यांचं मन
भांडुप येथे असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
Bhandup Fire भांडुप येथे असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. सुरुवातीला कमी वाटणारा मृतांचा आकडा वेळ पुढे जात होता तसा वाढत गेला. काळानं केव्हा आणि कसा घाला घातला यावर मृतांच्या कुटुंबियांचा विश्वासच बसेना. एकाएकी दु:खाचा डोंगर कोसळलेल्या याच कुटुंबांपैकी एका कुटुंबातील मुलीची तिच्या वडिलांचा शोधण्यासाठीची धडपड सुरु होती. मनावर शब्दांतही व्यक्त न करता येणारं.
वडिलांचा शोध घेण्यासाठीही ही धडपड मात्र अपयशीच ठरली. सायंकाळच्या सुमारास मृतांचा आकडा वाढत असतानाच काळजाचा थरकाप उडवणारं आणखी एक वृत्त समोर आलं. अशोक वाघमारे नावाच्या गृहस्थांना गुरुवारी ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे ड्रीम मॉलमध्ये असणाऱ्या कोविड रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री आग लागल्यापासून त्यांचा काहीही पत्ता लागत नव्हता. त्यामुळं तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर त्यांचा मृतदेह कुलिंग ऑप्रेशन सुरू असताना चौथ्या मजल्यावर सापडला. अशोक वाघमारे यांना नायर रुग्णालयातून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. पण, इथं मात्र त्यांच्या आयुष्यावरच नियतीनं घाला घातला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर महाराष्ट्र शासन आणि पालिका प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. भंडाऱ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या महाभयंकर दुर्घटनेचा संदर्भ देत सरकारला जाग येणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला. 'भंडाऱ्याच्या घटनेनंतर सर्व रुग्णालयांचं ऑडिट आम्ही करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. विशेषत: तातपुरत्या स्वरुपातील रुग्णालयांची फायर ऑडिट झाली पाहिजेत अशी मागणी करण्यात आली होती. हे ऑडिट करु अशी सुचनाही देण्यात आल्याची माहिती समोर आली. पण, प्रत्यक्षात मात्र तसं काहीही झालेलं दिसत नाही', असं ते म्हणाले.
....आणि होत्याचं नव्हतं झालं
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या सुरुवातीला या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण, पुढे मात्र मृतांचा आकडा वाढला.
ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले.