प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा जास्त काळ लांबत चालल्याने बाळासाहेब थोरात यांची नाराजी
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र, वाढता विलंब पाहून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षात राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही. यावरुन सध्याचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे मत थोरात यांनी एबीपी माझाशी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले मंत्री बाळासाहेब थोरात? एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, या निवडणुकीत पक्ष कसा सामोरा जाईल याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. फार काळ हे चालणे योग्य नाही, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी तातडीने घ्यावा असं आमचं मत आहे. श्रेष्ठींना वाटत असेल प्रदेशाध्यक्ष वेगळा असावा, एकाच व्यक्तीकडे दोन्ही जबाबदारी नको तर तशी संधी एखाद्या तरुण नेतृत्वाला द्यावी. काहीही वाटत असलं तरी शेवटी निर्णय घेणारे श्रेष्ठ आहेत. (थोरात कायम रहावेत असं अनेकांना वाटतं या प्रश्नावर) एका पक्षाचे सरकार असलं तरीसुद्धा अंतर्गत प्रश्न असतात इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. कमी कालखंडात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. पक्षाला सत्तेत सहभागाचे मंत्रिमंडळ बनलं, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्याचं थोरात यांनी सांगितलं.
थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही : यशोमती ठाकूर
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, पण बदलाबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशी परतल्यावरच होणार आहे. दोन दिवस मुंबईत मंत्री, आमदारांसोबत मंथन करुन दिल्लीत पोहोचलेले महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दिल्लीत कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीविनाच कर्नाटकमध्ये परतले. दिल्लीत संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्यासोबत त्यांची बैठक अपेक्षित होती, ती बैठक न होताच एच के पाटील हे कर्नाटकला परतले. एच के पाटील यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचंही सांगितलं जात होतं.
Maharashtra Congress प्रदेशाध्यक्ष कोण होणार? दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात