मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे या कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात सध्या 6 लाख 85 हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे 10 ते 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात सहा ठिकाणं अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर 500 बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे. याबाबत निर्णय घेण्यात येत असून त्याच ठिकाणी तात्पुरते रुग्णालय उभारले जाऊ शकतात असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले कि, राज्यात सध्या 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून परराज्यातून सुमारे 300 मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे 500 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता 98 टक्के असून रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी 500 खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे 3000 खाटांची भर पडणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे 300 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून 500 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यात अशा पद्धतीने एकूण 1550 मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे.
महाराष्ट्रात आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे. राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.