मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप समान व्हावं, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. अहमदनगरला जाणारा ऑक्सिजनचा टँकर काल पुणे जिल्ह्यात थांबवण्यात आला होता. यानंतर मुख्य सचिवांना संपर्क करुन नगरकडे निघालेला टँकर योग्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर टँकर नगरकडे रवाना झाला. त्यामुळे राज्यात सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचं वाटप समान व्हावं अशीच आपली भूमिका आहे, असं थोरात म्हणाले.


अहमदनगर जिल्ह्यात काल (20 एप्रिल) ऑक्सिजन तुटवड्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने धावपळ केली आणि ऑक्सिजनची व्यवस्था केल्यामुळे मोठं संकट टळलं.


ऑक्सिजनचे नियोजन केलं पाहिजे : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की,  "जिल्ह्यात अनेक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ऑक्सिजनची गरज आहे पण पुरवठा नाही. कालची रात्र भयानक होती. सगळीकडून फोन येत होते. नगरकडे येणारा ऑक्सिजनचा टँकर थांबवण्यात आला होता. तेव्हा मला हस्तक्षेप करावा लागला. मी मुख्य सचिवांशी बोललो. नगरकडे जाणारा टँकर थांबवू नका हे बरोबर नाही. हे सांगितल्यानंतर टँकर नगरकडे रवाना करण्यात आला. कमतरता आहे त्यामुळे ऑक्सिजनचं नियोजन केलं पाहिजे. ज्यावेळी मोठे नेते एखाद्या जिल्ह्यात आहेत तेव्हा तिथे सगळं जाईल पण इतर जिल्ह्यात अभाव होईल. त्यामुळे राज्य पातळीवर समान वाटप केलं पाहिजे. प्रत्येकाला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर मिळालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने काटकसरीने वापर करावा. "


"टीका करणं, राजकारण करणं हे विरोधकांचं काम आहे. कोरोना संपू द्या मग जाहीर सभेतील भाषणात टीका करावी. पण सध्या सगळ्यांनी जनतेला मदत करावी," असा सल्लाही थोरात यांनी दिला.


पंतप्रधानांनी मागच्या वर्षी वेळ न देता लॉकडाऊनचा पर्याय वापरला होता : थोरात
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात 15 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर एकमत झालं. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेला संबोधताना राज्यांनी अंतिम पर्याय म्हणून लॉकडाऊनचा वापर करावा, असं म्हटलं. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, "पंतप्रधानांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय अस म्हटलं. परंतु लॉकडाऊन हा पर्याय सगळ्या जगाने स्वीकारलेला आहे. मागच्या वर्षी कोणालाही वेळ न देता हा पर्याय वापरला होता. त्यावेळची भूमिका वेगळी घेतली आणि आता ही भूमिका? गुजरात, भोपाळ, लखनौमध्ये परिस्थिती काय आहे? आकडे दाबून ठेवले तरी स्मशानभूमीतील आकडे सत्य दाखवतात. पंतप्रधान असं का बोलतात हे कळत नाही."


'आशिष देशमुख पंतप्रधानांशी संवाद साधतात'
महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी लावा, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. त्याविषयी विचारलं असता थोरात म्हणाले की, "याबाबत मी बोलू शकत नाही. देशमुख पंतप्रधानांशी संवाद साधतात."


अभिमन्यू काळे यांच्या बदलीबाबत बोलू इच्छित नाही : थोरात
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री अभिमन्यू काळे यांच्या बदलीवर स्पष्ट भाष्य करण्यास थोरात यांनी नकार दिला. "प्रशासन चालवताना काही बदल करावे लागतात. मला या बदलीबाबत माहित नाही, त्यामुळे काही बोलू इच्छित नाही," असं थोरात म्हणाले. 
FDA चे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शन्स उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या अपयशामुळे राज्य सरकारने बदलीचा निर्णय घेतला आहे. परिमल सिंह यांच्याकडे आता एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली.