मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे.
राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 7654 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 7654 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 4 हजार 466 वर पोहोचली आहे. सध्या 83 हजार 450 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 92 दिवसात 12 कोटी लसींचे डोस
भारतात कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू आहे. 92 दिवसात 12 कोटी कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. 12 कोटी लसींचा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला 97 दिवस आणि चीनला 108 दिवस लागले होते. देशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या डोसपैकी 59.5 टक्के लसींचे डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1 कोटी 21 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या चार राज्यांत प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार
राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. राज्यात आता व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.