2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही : सामना
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ती 'सामना'च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असं म्हणत शिवसेनेनं भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे. 2019मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असं म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ती 'सामना'च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असं म्हणत शिवसेनेनं भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे. 2019मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असं म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन आज (मंगळवारी) साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती.
दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचं याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. दिल्लीतील आपचं आंदोलन, जवानांची हत्या, लोकशाहीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती? '2014 चा राजकीय अपघात 2019 सालात होणार नाही. सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल', अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर तोफ डागण्यात आली आहे.
महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल 'धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्य़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे', असा सूचक इशारा भाजपला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.