Raj Thackeray | युतीत इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला.
मुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, अशी टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली. याशिवाय शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावरुनही राज ठाकरेंनी टीका केली.
सत्तेत असताना मधल्या काळात शिवसेना-भाजपचे संबंध विविध कारणांवरुन ताणले गेले होते. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना युतीत इतकी वर्ष सडली असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर जागावाटपावरुन निशाणा साधला. इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यावेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो असं म्हटलं, मात्र कधी राजीनामा दिला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नुसत्या थापा मारल्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
झाडं कापल्यानंतर आरेला जंगल घोषित करणार का?
आरेतील वृक्षतोडीवरुनही राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. आरेतील शेकडो झाडे कापली, न्यायालये देखील सरकारला साजेसं असे निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? असं राज ठाकरेंनी म्हटलं.
मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती. आरेमध्ये कार शेड नको यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला. ज्याठिकाणाहून मेट्रो सुरु होत तिथे कार शेड करा, सरकारला सूचवलं होतं. मात्र सरकारला कोणाच्या घशात ती जागा घालायची आहे? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.
कलम 370 च्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवलं त्याबद्दल अभिनंदन करतो. भाजप महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या 370 कलमबद्दल बोलत आहेत, मात्र कलम 370 चा राज्यातील निवडणुकीशी काय संबंध आहे. राज्यातील प्रश्नांवर कधी बोलणार? बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर कधी बोलणार? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. राज ठाकरेंच्या गोरेगावमधील सभेतील मुद्दे- भाजप-शिवसेने सरकारकडून रोज नवनवीन थापा ऐकायला मिळतात - राज ठाकरे
- ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरुन निवडणुकीवर बहिष्कार टाकायला विरोधी पक्षांचा नकार - राज ठाकरे
- ईडीची चौकशी लावली तरी माझं थोबाड बंद होणार नाही- राज ठाकरे
- निवडणुकीच्या राजकारणासाठी चौकशा मागे लावल्या आहेत- राज ठाकरे
- जे घाबरले ते भाजपमध्ये गेले, मी या सगळ्या चौकशांना घाबरत नाही- राज ठाकरे
- आरेवरुन शिवसेना सर्वांना मुर्ख बनवतेय - राज ठाकरे
- पर्यावरण मंत्री शिवसेनेचे असताना आरेतील झाडे कापली कशी? - राज ठाकरे
- आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? राज ठाकरेंचा सवाल
- भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेले, कुठे राहिलं 'पार्टी विथ डिफरन्स'- राज ठाकरे
- बाळासाहेब असताना शिवसेनेत बाहेरचे नेते आयात करावे लागत नव्हते- राज ठाकरे
- कलम 370 रद्द केलं त्याबद्दल अभिनंदन, मात्र इतर मुद्द्यांवर कोण बोलणार? - राज ठाकरे
- कलम 370 चा महाराष्ट्रातील राजकारणाची काय संबंध - राज ठाकरे
- शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनाम्याची केवळ धमकी दिली
- आमची युतीत इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, उद्धव ठाकरेंना टोला
- जपानकडून 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी आहे, यासाठी आदिवासींच्या जमिनी का घेतल्या जात आहेत - राज ठाकरे
- राज्यातील खड्ड्यांवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- शहरांचं नियोजन कोसळलंय, एक-दीड तासाच्या पावसाने पुणे भरतं कसं? राज ठाकरेंचा सवाल
- निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात, पुन्हा परिस्थिती जैसे थे - राज ठाकरे
- विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षात जातात आणि सत्ताधारीही काही बोलत नाहीत, मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?- राज ठाकरे
- तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं त्याचं काय झालं? - राज ठाकरे
- उद्योग बंद पडत असल्याने अनेकजण बेरोजगार झाले - राज ठाकरे
- राज्याला सक्षम, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे- राज ठाकरे
- मी विरोधी प्रबळ विरोधी पक्षाची मागणी करत आहे - राज ठाकरे
- माझ्या हाती विरोधी पक्षाची सत्ता द्या, राज ठाकरेंचं नागरिकांना आवाहन