(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस कायम; राहुल गांधींच्या सभेला मिलिंद देवरा, संजय निरुपम गैरहजर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबई दोन सभा आज पार पडल्या. या दरम्यान मुंबई काँग्रेस मधील धुसपूस दिसून आली. दोन्ही सभांना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम गैरहजर होते.
मुंबई : मुंबई काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस विधानसभा निवडणुकीदरम्यानही सुरुच असल्याचं आज राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभांमध्ये दिसून आलं. राहुल गांधींच्या सभेकडे मुंबईतील अनेक काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली. राहुल गांधी यांच्या मुंबईत दोन सभा होत्या, मात्र दोन्ही सभांना मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम उपस्थित नव्हते.
काँग्रेस उमेदवार नसीम खान यांच्या चांदिवलीतील सभेला काँग्रेस नेत्या प्रिया दत्त उपस्थितीत होत्या, मात्र मिलिंद देवरा आणि संजय निरुपमांनी दांडी मारली. राहुल गांधी यांची धारावी येथील सभा मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आयोजित केली होती. येथेही मिलिंद देवरा आणि संजय निरूपम गैरहजर होते.
काही दिवस आधीच संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली होती. मात्र निरुपम कौटुंबिक समारंभानिमित्त आले नाहीत, असं त्यांच्या कार्यालयाने कळवलं. तर मिलिंद देवरा हे मुंबईच्या बाहेर असून सभेला ते नसतील त्यासंदर्भात राहुल गांधी यांना आधीच कळवलं असल्याचं त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विस्कळीत झालेल्या मुंबई काँग्रेसमध्ये अद्यापही धुसपूस कायम असल्याचं आज दिसून आलं.
राहुल गांधी यांच्या मुंबईतील भाषणातील मुद्दे- जर अर्थव्यवस्था कमकवूत असेल तर देश कमकुवत होणार.
- नरेंद्र मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलं, ते काँग्रेसने कधीही केलं नाही.
- देशातील अनेक व्यवसाय, उद्योग बंद पडत आहेत.
- नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलत नाही.
- अर्थव्यवस्थेची अवस्था अशीच राहिली तर देशात आग लागेल, आता सुरुवात झाली सहा महिन्यात काय अवस्था होणार.
- मोदी चांद्रयानावर बोलत आहेत, मात्र रॉकेटने लोकांचं पोट भरणार नाही.
- धारावीच्या जनतेला सांगा तुम्ही इथल्या व्यापारासाठी काय केलं? सगळ्यात जास्त बेरोजगारी आज का हे सांगा.
- महाराष्ट्रात 2 लाख लोक बेरोजगार झाले, पुण्यातही तीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये हिरे, कपडे व्यापार बंद झाला.
- नरेंद्र मोदी 15 लोकांची चौकीदारी करत आहेत.
- नोटबंदीनंतर अंबानी, ललित मोदी, अदानी यासारखे कुणी बँकांच्या रांगेत उभं होते का?
- जीएसटीचा काय फायदा झाला? उलट जीएसटीमुळे नुकसानचं झालं.