Sada Sarvankar: बंदूक सदा सरवणकर यांचीच, पण गोळी अन्य व्यक्तीने झाडली; पोलिसांचा अहवाल
Shivsena Prabhadevi Rada : गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी गोळीबाराची घटना घडली होती. ती आमदार सदा सरवणकर यांनी झाडली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

मुंबई: प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
ही बंदूक माझीच होती, पण ती गाडीत होती. कुणीतरी ती घेऊन येत असताना त्यावेळी गोळी चुकून गोळी झाडली गेल्याचं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.
तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी मात्र हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला आहे. अशा घटनांमुळे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था ठासळत आहे. पोलिसानी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता आता हा अहवाल दिला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताही कमी होत आहे.
काय आहे प्रकरण?
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं.
पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
वादाचं नेमकं कारण काय?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. त्या दरम्यान, दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
