BMC Election : ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई, भाजप-शिंदेंचे तगडं आव्हान; मुंबई महापालिकेचा सारीपाट मांडला
Mumbai Election : यंदा भाजपच्या आशा वाढल्या असल्या तरी राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे त्याचं बारीक लक्ष आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र भाजपसमोरच मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

BMC Election News : मुंबई महानगरपालिकेसाठी वातावरण तापू लागलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यांच्यासमोर महाशक्ती भाजप आणि शिंदेसेनेचं तगडं आव्हान असणार आहे. ही निवडणूक राज ठाकरेंच्या मनसेसाठी दूरगामी परिणामांची तर गलितगात्र काँग्रेसला उभारी देणारी ठरू शकते. दूर बारामतीच्या माळेगावातून शरद पवार सुद्धा या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. यावरुन बीएमसी निवडणुकीचं महत्व लक्षात येईल.
उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवेंद्र फडणवीसांचा भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी तगडी स्टार कास्ट मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाली आहे. काहीही करुन मुंबईपालिकेची सत्ता किंवा सत्तेत वाटा मिळवण्याचा प्रयत्न हे सगळे करणार आहेत. युती, आघाड्यांच्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांची चाचपणी होत आहे.
सगळ्यांचे डोळे मुंबईच्या दिशेनं रोखले आहेत. त्यामुळेच देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली. सगळी फोडाफोडी करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत नाही ही अमित शहांची डोकेदुखी आहे. म्हणूनच ते सातत्याने मुंबई दौरा करत आहेत अशी टीका ठाकरेंच्या नेत्यांनी केली.
उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या भाषणात सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची नांदी दिसत होती. 'मुंबईत हिंदू-हिंदूंमध्ये भाजपला मारामाऱ्या लावयाच्या आहेत. हिंदी सक्ती तर करूच देणार नाही, देवेंद्र काय करायचा ते करा. गुजरातमध्ये जाऊन तुम्ही हिंदी सक्ती करा. गुजरातमध्ये सू करें छे' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. यांनी सध्या मुंबईचा लढा कॅम्पेन सुरू केलं आहे. हा लढा आता आठवला, सत्तेत असताना काय केलं? लढायला घराबाहेर तर पडायला हवं. घरात बसून होतं नाही. आता जे काही घरातून बाहेर पडत आहात त्या मागे एकनाथ शिंदे आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील. मुंबईचं महत्व कमी होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य, शरद पवारांचं वक्तव्य
इकडे मुंबईत दोन शिवसेनेमध्ये जुंपलेली असताना शरद पवार तिकडे दूर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. तरीही बीएमसी निवडणुकीवर बोलण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. निवडणुकीबाबत मविआतील तिन्ही पक्ष मिळवून ठरवू असं त्यांनी सांगितलं. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते बसून ठरवू. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे असं ते म्हणाले.
मुंबईत आतापर्यंत शिवसेना आणि काँग्रेस अशीच पारंपरिक लढत राहिली आहे. राष्ट्रवादीचं अस्तित्व इथे नाममात्र आहे. त्यामुळेच शरद पवार उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाचा मान देऊन मोकळे झाले. भाजपच्या चंद्रकातदादा पाटलांनी तोच धागा पकडून हलकी टपली मारुन घेतली. पवार यांना अलीकडे त्यांच्यापेक्षा कोणी पॉवरफुल आहे हे सांगावं लागत आहे चांगलं आहे. आपल्या पेक्षा लहान असलेल्यांना पॉवरफुल आहे म्हणणं हे तर चांगलं आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपच्या आशा वाढल्या
सन 2017 साली भाजपने तब्बल 82 जागा जिंकत मुंबईत अनपेक्षित मुसंडी मारली होती. त्यावेळी अखंड शिवसेना फडणवीस सरकारचा भाग होती म्हणून भाजपने बीएमसीवर दावा केला नाही. फक्त 2 जागा जास्त मिळालेल्या उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका सोडली होती. यावेळी भाजपच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.
राज ठाकरेंचा भाव वधारला
सध्या सुरु असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये राज ठाकरेंचा भाव वधारला आहे. राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप-महायुती असे सर्व पर्याय खुले आहेत. मुंबईत मनसे किंग बनली नाही तरी किंग मेकरच्या भूमिकेत दिसू शकते.
राज ठाकरेंचं करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर जोवर सापडत नाही तोवर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनाही चैन पडणे कठीण आहे. त्यातच मुंबई पालिका निवडणूक आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी रंगणार असल्याचीही चर्चा आहे. मुंबई कोणाची? मुंबईचा किंग कोण? या प्रश्नाचं उत्तर येत्या चार-पाच महिन्यात आपल्याला मिळणार आहे. तोवर होणाऱ्या उलथापालथीचा अंदाज बांधत राहणे एवढंच आपल्या हाती.
























