बिग बी बच्चन यांच्या 'प्रतिक्षा' बंगल्याच्या भिंती पाडणार? रस्ता रुंदीकरणासाठी BMCकडून कारवाईची शक्यता
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या भिंती तोडण्याची कारवाई लवकरच होऊ शकते.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या (Pratiksha Bungalow) भिंती तोडण्याची कारवाई लवकरच होऊ शकते. बंगल्याच्या बाजूचा असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या भिंती तोडण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.
प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.
प्रतिक्षा बंगलाच्या शेजारील इमारतींमधील लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरचा रस्त्यावर रोड मॅपिंग तसेच मार्किंग करत आहेत. त्यामुळे येणारा काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिका के/पश्चिम विभागाचे वॉर्ड ऑफिसर विश्वास मोटे यांच्याशी आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.