माझा कट्टा : कमलताई परदेशी... शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या 'मसाला क्वीन'
कमलताईंनी आपल्या या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरु केली. मसाला तयार होईल पण तो विकायचा कसा हे कठीण काम होतं. त्यानंतर पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर मसाल्याची विक्री सुरु केली.
Majha Katta : शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कमलताई परदेशी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. बचत गट काय असतो, बँकेत कसं जायचं, तिथे पैसे कसे भरायचे अशी सुरुवात करणाऱ्या कमलताईंचा प्रवास आज ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती देताना कमलताईंनी सांगितलं की, 2000 साली बचत गटाची चळवळ राज्यात जोरदार सुरु होती. त्यावेळी शेतमजुरी करणाऱ्या आम्हा महिलांना बचत गटाची तुजपुंजी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही एकूण 11 निरक्षर महिलांनी एकत्र येऊन बचत गट सुरु केला. त्यानंतर मोलमजुरी करुन पैसे साठवून ते बँकेत जमा करण्यास सुरुवात केली. त्यातून काही महिन्यात थोडे पैशांची बचत झाली. प्रत्येक महिलेने महिन्याला शंभर रुपये बॅंक खात्यात जमा करण्याचे ठरले. खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून तीन महिन्यांत तीन हजार रुपये जमा झाले. त्यानंतर या पैशाचं काय करायचं यातून मसाला व्यवसाय करायचा असं ठरलं, असं कमलताईंनी सांगितली.
कमलताईंनी आपल्या या मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरु केली. मसाला तयार होईल पण तो विकायचा कसा हे कठीण काम होतं. त्यानंतर पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर मसाल्याची विक्री सुरु केली. मसाला विक्रीसाठी अनेकांनी मदत केली आणि कुठे कुठे मसाला विकला जाऊ शकतो याचीही माहिती दिली. अनेकांना आंबिका मसालेची चव आवडली त्यामुळे पुण्यातील सरकारी कार्यालयात देखील कमलताई आणि त्यांच्या सहकारी महिला मसाले विकायला सुरुवात केली. तेथे देखील गावाकडच्या मसाल्याची चव सर्वांनाच आवडली. सुरुवातील आमच्याकडे तीन प्रकारचे मसाले होते मात्र आज आम्ही 40 प्रकारचे मसाले विकतो, असं कमलताई यांनी अभिमानाने सांगितलं.
अंबिका मसाला थेट जर्मनीत
आमचं काम सुरु असताना आमच्या मसाल्याचा सुगंध नाबार्ड बँकेपर्यंत गेला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आमचा बचत गट अँजेला मर्केल यांना दाखवण्यासाठी नेला होता. त्यावेळी 14500 रुपयांचा चेक त्यांनी आम्हाला दिला होता. यावेळी अँजेला मर्केल यांनी भेटीवेळी आमच्याकडून अपेक्षा काय विचारल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्या, असं कमलताई म्हणाल्या. त्यानंतर जर्मनीत आमच्या अंबिका मलाल्याची विक्री होऊ लागली. त्यानंतर सुप्रियाताई सुळे देखील भेटल्या. त्यांनी मुंबईतल्या सर्व बिग बाजारला माल पोहोचवण्यास मदत केली.
कमलताई परदेशी यांनी स्वत:चा मसाल्याचा आज ब्रँड तयार केला आहे. मात्र येवढा मोठा पल्ला गाठूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. कारण कमलताईंना आपल्या सहकारी महिलांना चांगली घरं बांधून दिली मात्र त्या आजही साध्या घरात राहतात. घर ते फॅक्टरी हा प्रवास आजही त्या रोज पायी पूर्ण करतात.
नाबार्ड बँकेंची नोटीस
अंबिका मसाल्यासाठी जागा कमी पडू लागल्यानंतर 2018 मध्ये 20 गुंठ्याची जागा विकत घेतली. त्यात 2000 स्क्वेअर फूटांचं बांधकाम केलं. त्यात मशिनरी विकत घेतली. मात्र त्यानतंर नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, कोरोना काळ अशा अनेक संकटामुळे व्यवसायाला उतरती कळा लागली, अशी माहिती कमलताई यांनी दिली. फॅक्टरी उभारणीसाठी नाबार्ड बँकेकडून घेतलेला कर्ज काही प्रमाणात थकलं आहे. नाबार्ड बँकेची नोटीसही फॅक्टरीवर लागली आहे, असं कमलताईंनी सांगितलं. तरी देखील मी महिलांना सांगते जे परमेश्वराच्या मनात जे असेल ते घडेल. आपण गरीबच होतो. मात्र नाबार्डने नोटीस द्यायला नको होती. थोडंसं दडपण आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कमलताई यांनी म्हटलं की, कर्जामुळे ही संस्था विस्कटली तर यापुढे कुणीही कमलताई होण्याची हिंमत करणार नाही. कर्जमाफी नकोय आम्हाला फक्त मुदत द्या. बँकेचं लोन घेतलं आम्ही त्यावेळी आम्ही सबसिडी विचारली नाही. कारण आम्हाला आमच्यावर विश्वास होता, असं कमलताई म्हणाल्या.