भाजपचा नवाब मलिकांना आक्षेप, तरीही अजितदादा पाठीशी कायम; विधानसभेचं गणित काय?
Ajit Pawar Mumbai Jansanman Yatra : आधी नुसता बैठकीला उपस्थित असलेले नवाब मलिक आता अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर दिसले. त्यामुळे अजित पवार हे नवाब मलिकांच्या पाठीशी कायम असल्याचं दिसतंय.
मुंबई : नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील एक असं नाव ज्यावर भाजपचा आक्षेप आहे. मात्र अजितदादांना ते हवे आहेत. नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करून घेऊ नये अशा आशयाचं पत्र भाजपने दादांना लिहिलं होतं. त्याला आता वर्ष लोटलं. अशातच नवाब मलिक आता अजितदादांच्या कार्यक्रमात स्टेजवर दिसले. इतकंच काय तर, दादांनी मलिकांची कन्या सना यांना मानाचं पान दिलंय. हे सगळं करण्यामागे विधानसभेच्या तोंडावर दादांची काही गणितं आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईत पार पडली. त्याच कार्यक्रमाचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. कारण त्याच्यावर फोटो होता तो नवाब मलिक यांचा. तेच नवाब मलिक जे अजितदादांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर भाजपने त्याचा विरोध केला होता.
भाजपचा मलिकांना विरोध का?
- भाजपने नवाब मलिकांवर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत.
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक तुरुंगात होते. आता ते जामीनावर बाहेर आहेत.
- अजितदादांच्या बैठकीत मलिकांच्या उपस्थितीवर भाजपचा आक्षेप आहे.
फडणवीसांचा नवाब मलिकांना विरोध
असं सगळं असताना, आधी बॅनरवर झळकेले नवाब मलिक अजितदादांसोबत थेट स्टेजवरही दिसले. याबाबत माध्यमांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. त्यावर संदर्भातील माझी भूमिका मी स्पष्ट आधीच स्पष्ट केली आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. 7 डिसेंबर 2023 रोजी फडणवीसांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास विरोध केला होता.
देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाले तरी मलिकांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या मविआ सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. सद्या ते केवळ वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. मलिकांवरील आरोप पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असं पत्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलं होतं.
भाजपच्या आक्षेपानंतर वर्षभरानंतर अजित पवारांनी मलिकांना बहुदा पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सोबत घेतलं असावं. पण, हीच संधी साधत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय. अंबादास दानवे आणि सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
नवाब मलिकांबाबत भाजपची भूमिका आणि विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांचं भाषण झालं नाही. मात्र दादांनी नवाब मलिकांची कन्या सना यांना पक्षाचं प्रवक्तेपद बहाल करत पाठराखण करण्याची भूमिका घेतली.
विधानसभेचं गणित
नवाब मलिकांना भाजपचा आक्षेप आहे आणि विरोधकही टीकेचे बाण सोडतायत. या पार्श्वभूमीवर दादांनी नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना मानाचं पान दिलंय. विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत.
नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतात तिथं मुस्लिम मत ही निर्णायक आहेत. त्यामुळे त्यांना अडगळीत टाकणं हे अजितदादांना आणि पर्यायानं महायुतीला देखील परवडणारं नाही असं राजकीय विश्लेषक म्हणतात. याच बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा: