पेशाने व्यावसायिक असलेले आदित्य ठाकरे कोट्यधीश, संपत्ती तब्बल...
भाजपचे मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर लोकसभा सातारा पोटनिवडणुकीतील भाजपचे उदयनराजे यांच्यापेक्षा सपाचे अबू आझमी श्रीमंत आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एकूण 22.98 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता आहे, ती म्हणजे प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवारांची संपत्ती किती आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज नागरिकांना येतो. मात्र सध्याच्या घडीला सर्वजण वाट पाहत आहेत ती ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य युवानेते आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती आहे.
आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती
आदित्य ठाकरे कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरेंनी पेशाने व्यावसायिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू कार आहे. 64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.
भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार
आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण 441 कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर 283 कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
उदयनराजेंपेक्षा अबू आझमी श्रीमंत
समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी स्वत: आणि पत्नीकडे एकूण 209 कोटी 8 लाख चल-अचल संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या 157 कोटी 22 लाख तर पत्नी दमयंती यांच्याकडे 4 कोटी 14 लाखांची संपत्ती आहे. अशारीतीने एकूण 161 कोटी 36 लाख 75 हजार रुपयांची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. उदयनराजेंकडे 25 लाख आणि त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 95 हजार रोख रक्कम आहे.
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एकूण 22.98 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे जालन्यातील उमेदवार अर्जुन खोतकर यांच्याकडे 7.67 कोटींची तर मुलगा अभिमन्यूकडे 2.24 लाख रुपयांची संपत्ती आहे.