'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो? उर्मिला मातोंडकरांचा सवाल
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या मागे तीन-तीन केंद्रीय तपास यंत्रणा लावून, तासंतास तिची चौकशी केली गेली, यातून काहीतरी निघायला हवं होतं की नाही? असा सवाल उर्मिला यांनी उपस्थित केला.
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी कंगना रनौतने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाचे बॉलिवूडमध्ये ज्या काही लोकांशी वाईट संबंध आहेत, ते चार-दहा लोक म्हणजे बॉलिवूड नाही. बॉलिवूड खुप मोठी, सतत मेहनत करणारी इंडस्ट्री आहे. मात्र काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्याबद्दल असं बोलणे चुकीचं आहे, असं उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. एक अभिनेता तडकाफडकी या जगातून निघूत जातो, मात्र त्याच्या मृत्यूचं आज भांडवलं केलं जात आहे. यामुळे सुशांतच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळतोय का? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या मागे तीन-तीन केंद्रीय तपास यंत्रणा लावून, तासंतास तिची चौकशी केली गेली, यातून काहीतरी निघायला हवं होतं की नाही? असा सवाल उर्मिला यांनी उपस्थित केला.
कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा कशासाठी?
कंगनाच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षेबाबतही उर्मिला यांनी प्रश्न उपस्थित केले. वाय प्लस सुरक्षेसाठी पैसे कोण देतं? तुमच्या आमच्यासारखा लोकांच्या टॅक्सच्या पैशातून कंगनाला ही वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली. मात्र ती कशासाठी दिली गेली, असा प्रश्न उर्मिला यांनी उपस्थित केला. माझ्याकडे ड्रग माफियांची नावं असून ती तपास यंत्रणेला द्यायची असल्याचं तिने म्हटलं होतं. मात्र आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात मुंबईत न येता माहिती देणे सहज शक्य होतं. इंटरनेट, मेल, फोन सारखे पर्याय तिच्याकडे उपलब्ध होते. मग ती का आली? चिथवायला? असं उर्मिला यांनी म्हटलं.
कंगना सारखी भारतकन्या देशातील प्रत्येक भागात निर्माण झाली पाहिजे. ती केवळ मुंबईतच का आलीय? तिने आधी हिमाचल प्रदेशच्या लोकांकरीत काहीतरी करावं, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत कंगनाने सर्वकाही कमावलं. बॉलिवूडने कंगनाला भरभरुन दिलं, मात्र तरीही बॉलिवूडला नावं ठेवयची हे चुकीचं आहे, असं उर्मिला यांनी म्हटलं.
बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत बोलताना उर्मिला यांनी म्हटलं की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही असं मी बोलणार नाही. मला देखील बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचे परिणाम भोगावा लागला. त्या काळात माझ्यावर अनेक प्रकारे टीका करण्यात आली. त्यात मराठी असल्यानेही अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. विविध प्रकारच्या भूमिका केल्या अनेकांनी माझी कधी स्तुती केली नाही. मात्र बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी माझ्या कामाचं कौतुकही केलं.