नवी मुंबईत भाड्याने गाड्या घेत परस्पर विक्री करणाऱ्या भामट्याला अटक; दुबईला पळून जाण्याआधी कारवाई, 23 गाड्या जप्त
बोगस कंपनीच्या माध्यमातून संदीप रघु शेट्टी भाड्याने गाड्या लावतो असं सांगून गाड्या घेतल्या होत्या. मात्र नंतर याच गाड्या विकून आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता.
![नवी मुंबईत भाड्याने गाड्या घेत परस्पर विक्री करणाऱ्या भामट्याला अटक; दुबईला पळून जाण्याआधी कारवाई, 23 गाड्या जप्त Accused arrested for selling vehicles illegaly in Navi Mumbai, 23 vehicles seized नवी मुंबईत भाड्याने गाड्या घेत परस्पर विक्री करणाऱ्या भामट्याला अटक; दुबईला पळून जाण्याआधी कारवाई, 23 गाड्या जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/28/2eeca9454ee86ae79c852073cd780cb1_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : भाड्याने कार देण्याऱ्या कंपनीकडूनच गाड्या भाड्याने घेत फसवणूक केल्या प्रकरणी नवी मुंबईतून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 70 लाखांपेक्षा अधिक रुपयांच्या 23 कार जप्त करण्यात आल्या आहेत. परिमंडळ एक आणि गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत हे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची परस्पर विल्हेवाट लावत आरोपी दुबईत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
संदीप रघु शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप शेट्टी याने वाशीत रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्याने गाड्या भाड्याने लावतो असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या घेतल्या होत्या. दरम्यान इझी ड्राईव्ह नावाची कंपनी कोरोना काळात आर्थिक तंगी सहन करत असताना या कंपनीच्याही 25 गाड्या शेट्टी याने भाड्याने घेतल्या होत्या. दोन तीन महिने वेळेवर भाडेही दिले गेले. मात्र नंतर भाडे बंद झाले शिवाय शेट्टीकडून उडवा उडवीचे उत्तरे दिली जात होती.
तसेच गाडी भाडे करार जुलै 21 मध्ये संपुष्टात येऊनही शेट्टी संपर्क करत नव्हता. अखेर 18 सप्टेंबरला ड्राईव्ह इझी या कंपनीचे व्यवस्थापक इम्रान बेग यांनी शेट्टी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार तपास केला गेला मात्र शेट्टी हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांना तांत्रिक तपासात आरोपीचा ठाव ठिकाणा मिळाला व त्याला अटक करण्यात आली. दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आरोपी असतानाच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले .
आरोपीने शिताफीने गाड्या देशातील विविध भागात कमी किंमतीत गाड्या विकल्या होत्या. त्या गाड्यांचा पत्ता लावणे व जप्त करणे हे दिव्य पोलिसांनी पार पाडत 23 गाड्या जप्त केल्या. आरोपीने या फसवणुकीतून 60 लाखांच्या पेक्षा अधिक कमाई केली होती. खारघर येथील अत्यंत उच्चभ्रू वस्तीत अलिशान घरात शेट्टी राहत होता. त्याला जेव्हा अटक केली तेव्हा मुंबई विमानतळावर जाण्याच्या बेतात तो होता. दरम्यान गाड्या भाड्याने घेऊन परस्पर विक्री करण्याच्या कामात अनेक जणांचा हात असण्याची शक्यता असल्याने या दिशेने पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)