(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मुख्यमंत्री दिल्लीत, आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की, स्वतःसाठी? आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना चिमटा
Aaditya Thackeray : वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेलं? याबाबत अद्यापही राज्यसरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही, आदित्य ठाकरेंकडून शिंदे सरकारवर टीकास्त्र
Aaditya Thackeray : आज मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की, स्वतःसाठी गेले आहेत. हे आम्हासाला अजून माहीत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरुनही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासंदर्भात अद्यापही शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, "वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासंदर्भात अद्यापही सरकारकडून कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकी दिली जाते. अजूनही वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेलं? याबाबत अद्यापही राज्यसरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही."
पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी बल्क ड्रग पार्क प्रकल्पासंदर्भातही माहिती दिली. ते म्हणाले की, "बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी महाविकास आघाडी मंत्रिमंडळानंही रोहाजवळ रायगड जिल्ह्यात जागा दिली होती. त्यासाठी अडिच हजार कोटींची जागाही दिली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी आपण केंद्राकडे अप्लाय केलं, त्यावेळी आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरातला मिळालं. पण महाराष्ट्रात हा प्रोजेक्ट आला नाही. या प्रकल्पामुळेही जवळपास 70 ते 80 हजार युवकांना नोकऱ्या मिळू शकल्या असत्या. आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेज आहेत. तसेच, आपण वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये सर्वात पुढे आहोत. ज्या काही क्वॉलिफाईंग ड्रग कंपन्या असतात, त्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. हे दोन्ही प्रकल्प हातातून गेल्यानंतर आता एअर बस प्रकल्पाबाबतही अनिश्चितता आहे."
"आज मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की, स्वतःसाठी गेले आहेत. हे आम्हासाला अजून माहीत नाही. काही भेटी या जगजाहीर होत्या. जगजाहीर मला वाटतं ही आठवी भेट असेल आणि लपूनछपून ही बारावी भेट असेल. त्यात मी काही जाणार नाही.", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधला आहे.
"विरोधी पक्षांनी हे दोन मुद्दे वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या खोके सरकारनं जे काही एमआयडीमध्ये प्रकल्प आलेले. जे पेडिंग असून रिव्ह्यू होत होते, ज्यांच्यावर स्थगिती दिली होती. त्या सर्व प्रकल्पांवरील स्थगिती उठवण्याचा विचार सुरु आहे. याबाबतही कुठेच स्पष्ट करण्यात आलेलं नाही. काही प्रसार माध्यमांवर ही बातमी आली होती. कोणतीही यादी देण्यात आलेली नाही.", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.