काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार संपर्कात, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेलं नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही, गिरीश महाजन यांनी सांगितलं.
मुंबई : शरद पवारांनी भाजपवर केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही उत्तर दिलं आहे. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पवार आरोप करत असल्याचं महाजन यांनी म्हटलं. तसेच विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.
शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेलं नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही. चित्रा वाघ यांच्याशी महिनाभरापूर्वीच बोलणं झालं होते. राष्ट्रवादीत भवितव्य राहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
हसन मुश्रीफांवरील कारवाई कायद्यानुसार
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई कायद्यानुसार सुरु आहे. सूडबुद्धीने कारवाई करायची असती, तर सुनील तटकरे, अजित पवारांवरही कारवाई केली असती. ते तर दिग्गज नेते होते. पण आम्ही नियमानुसार कारवाई केली. ईडी, सीबीआय चौकशीमध्ये मुख्यमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत, हे देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
VIDEO | अपयश लपवण्यासाठी पवारांचे भाजपवर आरोप : गिरीश महाजन
विरोधी पक्षातील 50-60 आमदार संपर्कात
राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडू लागले आहेत, कुणाल घ्यावं असा प्रश्न आम्हाला पडला आहे. मात्र स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पक्षांतराचं खापर भाजपवर फोडलं जात आहे. शरद पवारांनी नावं घेतलेले सर्व नेते आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांना आम्हाल पक्षात घ्या अशी विनंती केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 50-60 आमदार माझ्या संपर्कात आहेत. दोन तीन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे, आठवडाभरात राष्ट्रवादीची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट होईल, असा दावा गिरीश महाजनांनी केला.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी दबावामुळे, भीतीपोटी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. लोकशाहीला आघात करण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला.