मुंबई : आपण कुणीही ब्रश करुनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खाननं रविवारी सकाळी ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासण्यास सुरुवात केली. मात्र ती सकाळ अफसानाच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली. कारण अफसानानं अनावधानानं टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्यासाठी वापरली जाणीर विषारी पेस्ट ब्रशवर घेतली होती. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडला आणि यामध्ये अफसाना खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


अफसाना खान जेव्हा सकाळी उठली आणि आपले दात घासायला गेली तेव्हा टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारायाची पेस्ट ठेवली होती. जी तिनं चुकून ब्रशला लावली आणि आपले दात घासण्यास सुरुवात केली. ब्रश करता करता वासावरून अफसानाला आपण टूथपेस्ट ऐवजी दुसरच काहीतरी लावल्याचं जाणवलं. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. जिथे टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारण्याची विषारी पेस्ट ठेवली गेली होती. नकळत तिनं ब्रशला उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, वास आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं जाणवलं तेव्हा तिनं लगेच तोंड धुतलं. मात्र तोंड धुतानाच अफसानाला अचानक चक्कर येऊ लागली आणि तिची तब्येत ढासाळू लागली. घडलेला सर्व प्रकार तिनं तिच्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी क्षणाचाही विलंब न करता अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जेजे रुग्णालयात अफसानावर उपचार सुरु होते, मात्र उंदीर मारण्याच्या पेस्टमधील विष संपूर्ण शरीरात पसरलं होतं आणि रविवारी संध्याकाळी अफसानाची दुर्दैवी मृत्यू झाला. 


अफसाच शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि ती घरीच असायची. तिच्या कुटुंबात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असा परिवार होता. आई फळं विकून आपलं घर चालवत होती. बहीणही घरीच असायची. पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल करून तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. तिच्या आईनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून आपल्याला या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर अफसानाने जराशी काळजी घेतली असती तर कदाचित तिला जीव गमवावा लागला नसता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :