मुंबई : मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती पहायला मिळाली आहे. मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेवर आधी टेम्पोसमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.


आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.


महिलेची प्रकृती गंभीर - डॉक्टर
प्राथमिक तपासानुसार महिलेवर बलात्कार करण्यात आला असून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की ही घटना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत घडली. अधिकाऱ्याने सांगितले की वाहनाच्या आत रक्ताचे डाग देखील सापडले आहेत. डॉक्टरांच्या मते, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.


आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.