Mudhojiraje Bhosale : सरसकट आरक्षणाची भानगड संपली पाहिजे, असं झाल्यास सर्वांचं चांगलंच होईल; नागपूरच्या मुधोजीराजेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो. आरक्षणाची भानगड संपली पाहिजे असं मला वाटत असल्याचे परखड मत मुधोजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.

नागपूर : आरक्षण संपलं तर सर्वांसाठी चांगलंच होईल. आज मराठा (Maratha Reservation) मागत आहे, उद्या ब्राह्मण ही आरक्षणाची मागणी करतील. मुळात आरक्षण दहा वर्षासाठी लागू झालं होतं. फक्त राजकीय पुढाऱ्यांमुळे ते कायम राहिलं आहे. आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो. आरक्षणाची (Reservation) भानगड संपली पाहिजे असं मला वाटत असल्याचे परखड मत नागपूरच्या भोसले घराण्याचे वारसदार मुधोजीराजे भोसले (Mudhojiraje Bhosale) यांनी व्यक्त केलं आहे.
मराठ्यांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं पाहिजे- मुधोजीराजे भोसले
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत मोठ्या संख्येने आंदोलक आंदोलनासाठी गोळा झाले आहेत. तर ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे, त्या भागातील लोकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आंदोलनासंदर्भात सरकारने लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ असलं पाहिजे. कोणाकडून आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता, मराठ्यांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं पाहिजे. आंदोलनात गेलेल्या तरुणांनी शांततेने आंदोलन केलं पाहिजे. आंदोलनाची एकी कायम राहिली पाहिजे. ओबीसी म्हणून मराठ्यांना आरक्षण आजच्या स्थितीमध्ये तर शक्य नाही. असे मतही मुधोजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.
त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील- मुधोजीराजे भोसले
आंदोलन पुढे वाढत जाताना मागण्यांमध्ये काही अंतर होत जातंय. ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहे, त्यांना सरकार ओबीसीमध्ये घेण्यास तयार आहे. मात्र त्यांना ओबीसीमध्ये घेतलेच पाहिजे. मात्र ज्यांच्याकडे दस्तावेज नाही, त्यांना ओबीसी मध्ये घेणे शक्य नाही. त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील. असेही मुधोजीराजे भोसले म्हणाले.
सुट्टी रद्द करुन हायकोर्ट उघडलं, मोठा निर्णय येणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य केले आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत केलं होतं. तसेच आझाद मैदानात आंदोलनासाछी 5 हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी:
























