Yugendra Pawar : दिल्लीपुढे झुकणार नाही! आजोबांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी' मिळताच युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकले
Yugendra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टने सुद्धा लक्ष वेधलं आहे.
Yugendra Pawar : राजकारण कितीही झालं तरी कुटुंबात राजकारण येऊ न देणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कुटुंबात सुद्धा फूट पडली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे दोन शकले झाली आहेत यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता त्यांचा नातू शरद पवार यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
दिल्लीपुढे न झुकण्याचा स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टने सुद्धा लक्ष वेधलं आहे. त्यामुळे युगेंद्र आता रोहित पवार यांच्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये शरद पवार यांच्या सोबतचा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या नव्या चिन्हाचे स्वागत करणारी पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार कुटुंबियांमध्ये प्रत्यारोपांचं सत्र
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार कुटुंबियांमध्ये प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वतः बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे पवार कुटुंबियांमधील पहिली राजकीय ठिणगी ही बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पडणार आहे. अजित पवार सातत्याने मला कुटुंबांकडून एकटे पाडले जाईल, तुम्ही एकटे पाडू नका अशा प्रकारची वक्तव्ये बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये करत आहेत. त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये आता पहिला सामना हा बारामती लोकसभा मतदारसंघांमध्येच रंगणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या