भिवंडीत धारधार शस्त्राने हल्ला करुन तरुणाची हत्या
संतराम मूळचा उत्तरप्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील रहिवाशी होता. कामानिमित्त तो त्याच्या लहान भावासह भिवंडी शहरातील बालाजीनागर येथे राहत होता.
भिवंडी : भिवंडी शहरातील बहात्तर गाला परिसरात तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या केली आहे. संतराम जयस्वाल असं या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
बहात्तर गाला परिसरालगत जंगल परिसर आहे. या जंगलाच्या परिसरात संतरामवर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यावेळी संतराम आरडाओरडा करत बहात्तर गाला या परिसरात धावत आला. हल्ल्यातून बचावासाठी संतराम जीव मुठीत घेऊन पळत होता. हल्ल्यात संतराम रक्तबोंबाळ झाला होता. बहात्तर गाला परिसरात पोहचल्यानंतर संतरामने आरडाओरडा करत मदत मागितली. मात्र मदत मिळण्याआधीच संतराम रस्त्यावर कोसळला आणि मृत पावला.
स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचं नेमकं कारण आणि हत्येमागे नेमके किती जण व कोण आहे, याचा तपास भोईवाडा पोलीस करीत आहेत.
संतराम मूळचा उत्तरप्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील रहिवाशी होता. कामानिमित्त तो त्याच्या लहान भावासह भिवंडी शहरातील बालाजीनागर येथे राहत होता. संतराम जयस्वाल नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दरम्यान संध्याकाळी संतराम लहान भावासह हॉटेलात चहाही प्यायला होता. मात्र काही महत्त्वाचे काम आहे असे सांगून निघून गेला आणि रात्री त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली.