Yavatmal Washim Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. 


असे असताना, यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात (Yavatmal–Washim Lok Sabha) मात्र काही अंशी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे बघायला मिळाले आहे. मात्र, नेमकं मतदानाच्या दिवशीच लग्नासाठीचा मुहूर्त असल्याने अनेकांनी याच दिवशी लग्न समारंभ उरकले असल्याचे बघायला मिळाले आहे. एकट्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तब्बल 324 लग्न समारंभ पार पाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या लग्न समारंभाचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर तर झाला नाहीये ना, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.     


अवघे 1.56 टक्क्यांनी वाढले मतदान


यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात एकूण 62.87 टक्के मतदान झाले. 2019च्या तुलनेत मतदान 1.56 टक्क्यांनी वाढले खरे. मात्र हा मतदानाचा टक्का किमान 1 ते दीड टक्क्याने अजून वाढला असता. पण याच दिवशी लोकसभेच्या यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, वाशिम आणि कारंजा या सहा विधानसभा मतदारसंघात छोटे-मोठे मिळून तब्बल 324 विवाह सोहळे पार पडले. त्यामुळे याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 


काय सांगते आकडेवारी? 


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात (Yavatmal Washim Lok Sabha Election) एकूण 19 लाख 40 हजार 916 मतदार आहेत. तर त्यातील केवळ 12 लाख 20 हजार 189 मतदारांनी प्रत्यक्षपणे मतदान केले आहे. यात पुरुष मतदारांची टक्केवारी ही 65.41 टक्के आहे. तर महिला मतदारांची टक्केवारी 60.15 टक्के इतकी आहे. असे दोन्ही मिळून एकूण मतदानाची टक्केवारी 62.87 टक्के झाली आहे. एक लग्नात किमान 400 वराती पकडल्यास 1 लाख 29 हजार 600 वरती मतदार होतात. यातील मतदार 1 लाख पकडल्यास किमान 1 ते दीड टक्का निश्चितच वाढला असता, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या