जालना: जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या पुन्हा एकदा अबोला पाहायला मिळाला. जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या उपनयन कार्यक्रमांमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळाले. मात्र जवळपास अर्धा तास एकाच ठिकाणी बसूनसुद्धा दोघांमध्ये कोणतीही संवाद न झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. दानवे आणि खोतकर  15 दिवसांपूर्वीच राजकीय वैमनस्य विसरून प्रचारासाठी एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांनी एकत्रित प्रचार करण्याचा निर्धार ही बोलून दाखवला. मात्र, एकाच कार्यक्रमात असून सुद्धा दोघांत कोणतीही संवाद न झाल्याने पुन्हा दोघांत  काही बिनसलंय का, याची चर्चा सुरु झालीय.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजपने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी दिली आहे. रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या कल्याण काळे यांना रिंगणात उतरवले आहे. सध्याच्या घडीला रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, महायुतीमधील अंतर्गत हेवेदावे कायम राहिल्यास मतदानानंतर जालन्यात वेगळे चित्र पाहायला मिळणार का, हे आता पाहावे लागेल.


रावसाहेब दानवेंकडे 42 कोटींची संपत्ती


रावसाहेब दानवे यांनी अलीकडेच लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी रावसाहेब दानवे यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती नमूद केली होती. त्यानुसार रावसाहेब दानवे यांच्याकडे तब्बल 42 कोटींची संपत्ती आहे. दानवेंच्या कुटुंबाकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण 42 कोटी मालमत्ता 59 लक्ष 82 हजार रुपयांची संपत्ती आहे.दानवे यांच्या उत्पनात मध्ये गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली असून त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंच्या उत्पनात 6 लाख,24  हजार रूपयांची वाढ झाली  असल्याचे दानवे यांनी निवडणूक आयोगास दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.


आणखी वाचा


मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात हे माहितीय का? : रावसाहेब दानवे