यवतमाळ :  यवतमाळ उमरखेड येथील उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयाचे 43 वर्षीय बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांची 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उत्तरवार रुग्णालयासमोरच्या उमरखेड पुसद रोडवर एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिली आहे.


या प्रकरणाचा जलद गतीने छडा लावण्यासाठी पोलीस स्टेशन उमरखेड, बिटरगाव, पोफाळी, दराटी यांचे प्रत्येकी एक पथक, स्थानिक गुन्हे शाखाची चार पथके व सायबर सेलची दोन पथके अशी पोलिसांची एकूण 10 पथके तयार करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या. घटनास्थळावरील तसेच उमरखेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फूटेज संकलित केले. त्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा पूर्व इतिहास, कौटुंबिक पार्श्वभूमी व आर्थिक वाद यावरून डॉक्टरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याकरिता प्रयत्न केले गेले. यामध्ये डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या वैद्यकीय सेवाकाळात घडलेल्या घटनांबाबत सखोल माहिती घेतली असता 4 मे 2019 च्या रात्री  2 च्या सुमारास उमरखेड येथील स्थानिक शिवाजी चौक येथे मोटारसायकलचा अपघात झाला होता. त्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले.


त्यादरम्यान जखमी याचा मृत्यू झाला. त्यावेळेस उत्तरवार कुटीर रुग्णालय येथे डॉ. हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर हजर होते. त्या अपघातात जखमी अरबाज शेख अब्रार याचा डॉ. हनुमंत धर्माकार यांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी त्यावेळी केला होता. त्यादरम्यान पोलिसांनी घटनेची शहानिशा करून गुन्हा नोंद करून प्रकरण हाताळले होते. त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ ऐफाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी डॉक्टरांसोबत हुज्जत घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. 


या प्रकरणातील तांत्रिक बाबींचे बारकाईने विश्लेषण केले असता या घटनेतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असलेली संशयित व्यक्ती ही शेख ऐफाज शेख अब्रार याच्यासारखी चेहरेपट्टी व शरीरयष्टीची दिसत असल्याने त्याबाबत गोपनीय माहितीवरून 22 वर्षीय आरोपी शेख ऐफाज ऊर्फ शेख अब्रार यानेच उमरखेड तालुक्यातील ढानकी येथील त्याचा मामा सय्यद तौसिफ सय्यद आणि त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टरांना गोळ्या झाडून त्यांना ठार मारुन ढाणकी येथून पसार झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.


शेख ऐफाज शेख अबरार याने त्याचा मृतक भाऊ शेख अरबाज यांच्या मृत्यूचा वचपा व बदला घेण्याच्या उददेशाने तसेच त्याच्या भावाच्या मृत्यूचा डॉक्टरांकडून प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडून ठार मारल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलीस सध्या पसार असलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.


संबंधित बातम्या


Yavatmal Crime : उमरखेड्यातील बालरोगतज्ज्ञ हत्त्या प्रकरणात आरोपी शोधण्यासाठी पोलिसांची 5 पथक तैनात


Indian Army Day 2022: नवा गणवेश, नवा जोश; भारतीय लष्कराला मिळाला कॉम्बॅट युनिफॉर्म


Maharashtra Corona Update : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, गेल्या 24 तासात 42,462 रुग्णांची नोंद तर 23 जणांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha