Majha Katta : सध्याची शहरं ही फुलांच्या गुच्छाप्रमाणे आहेत. ती एकत्र दाबून बसवलेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होतोय आणि अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. पण आदिवासी समाज असो वा ग्रामीण समाज असो, तो फुलांच्या माळेप्रमाणे आहे. तो एकत्र आहे पण विखुरलेला आहे. त्यामुळे कोरोनासारखी स्थिती निर्माण झाल्यावर तुलनेने कमी नुकसान होतंय. त्यामुळे आता आपल्याला अधिक विकेंद्रीत नगररचना हवीय का याचा विचार करावा लागेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी मांडलं. 


देशभरातील अतिदुर्गम भागातील नागरिक आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी शोधग्रामच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये मोठं काम केलंय. 


डॉ. अभय बंग म्हणाले की, "गर्दी असलेल्या शहरांमध्ये हा रोग झपाट्याने पसरला. त्यामुळेर आपल्या शहरी नीतीवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. आपली अर्थरचना महाकाय शहरांची मागणी करते तर अशी महामारी त्यांना नष्ट करते. त्यामुळे आपल्याला अधिक विकेंद्रीत नगररचना हवीय का याचा विचार करावा लागेल. शहरांना विकेंद्रीत करुन समाजाला विखुरलेल्या स्वरुपाच  वसवावं हे अधिक उपयुक्त ठरेल."


आदिवासी पाड्यांमध्ये लोक अधिक विखुरलेले आहेत. त्यामुळे कोरोनासारखी परिस्थिती या आली की त्या ठिकाणी तेवढ्या तीव्रतेने प्रसार होत नाही. तसेच कोरोनासारख्या रोगांवर उपाय शोधण्यासाठी वेळही मिळतो. शहरांमध्ये ते घडत नाही. 


डॉ. अभय बंग म्हणाले की, "या काळात आपण वॉटर हायजिन शिकलो, स्कीन हायजिन आणि हॅन्ड हायजिनही शिकलो. त्यामुळे विविध रोगांचा या माध्यमातून होणारा प्रसार हा कमी होण्यास मदत होईल. आता आपल्याला एअर हायजिन शिकावं लागेल. कारण हवेच्या माध्यमातून आता रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत आहे. हवेला शुद्ध कसं करता येईल असा विचार अद्याप झाला नाही. मग त्यासाठी खोल्या मोठ्या हव्यात, अधिक चांगल्या व्हेंटिलेशन एरियाचं डिझाईन तयार करायला हवं. जेणेकरुन दाटी होणार नाहीत आणि कोरोनासारख्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सोपं होईल."