Yavatmal News : पोहण्याचा मोह जिवावर बेतला! वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू
महाशिवरात्रीच्या यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर सालबर्डीचा हत्तीडोह आणि माडू नदीत देखील दोन व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे.
Yavatmal News यवतमाळ : महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2024) यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत (Wardha River) पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीत शुक्रवार 8 मार्चच्या सायंकाळच्या सुमारास घडली. संकेत पुंडलिक नगराळे (वय 27), अनिरुद्ध चाफले (वय 22) आणि हर्ष चाफले (वय 16) अशी वर्धा नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे असून नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
वणीच्या विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी असलेला संकेत, अनिरुद्ध आणि हर्ष हे तिघे भावंड महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रेला गेले होते. दरम्यान, यात्रेतून घरी परतत असताना वाटेत लागणाऱ्या पाटाळा येथील वर्धा नदीत पोहण्याचा त्यांना मोह झाला. त्या नंतर यातील एका भावाने पाण्यात उतरताच तो नदी पात्रात बुडत असल्याचे दिसून आले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो बुडत असताना इतर दोघा भावंडांनी त्याच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यात तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, वणी पोलिसांचे आणि माजरी (जि. चंद्रपूर) येथील पोलिसांच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच वणी येथील ठाणेदार अनिल बेहरानी हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने काही काळ या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अंधार झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. आज सकाळी एनडीआरएफची पथकाद्वारे शोध मोहिम राबवून आज पुन्हा या तरुणांचा शोध सध्या सुरू आहे.
सालबर्डीचा हत्तीडोह आणि माडू नदीत बुडून दोघांचा मृत्यू
अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र सालबर्डी येथील हत्तीडोह येथे घडली आहे. कायम शांत भासणाऱ्या मात्र पाण्याला प्रचंड प्रवाह असणाऱ्या हत्तीडोहाने यापूर्वी देखील अनेक बळी घेतले आहे. अशातच पुन्हा एकदा पाण्याचा अंदाज न आल्याने एका 45 वर्षीय व्यक्तिचा पाण्यात वाहून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, अशीच एक घटना महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या माडू नदीत घडली आहे. लक्ष्मण अर्जुन भुले (वय 67) असे या व्यक्तीचे नाव असून ते अमरावती तालुक्यातील शिराळा येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहिती नुसार ते सालबर्डी येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले असतांना ते नदीत वाहून गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता, शनिवारी त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातून वाहत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेतील माडू नदीच्या पुलाखाली आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह नदीबाहेर काढून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला आणि त्यानंतर तो मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या