अशोक चव्हाणांना ब्लॅकमेलिंग करुन भाजपनं फोडलं, जनता भाजपला थारा देणार नाही; यशोमती ठाकूरांचा घणाघात
अशोक चव्हाणांना ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही असे वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं.
Yashomati Thakur : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडलं आहे. मात्र, भाजपानं कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही असा दावा यशोमती ठाकूर यांनी केलाय.
भाजपकडून ईडी, सीबीआय या यंत्रणांची नेत्यांनी भीती
केंद्र सरकारनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होता. मात्र, अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करुन राजीनामा द्यायला भाग पाडले. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळं भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत असल्याचे चव्हाण म्हणाले. काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चितच आपल्याकडे दबाव टाकून ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते. मात्र तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुचणारी नाही असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
विकृत राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत होणारं
अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल याची आम्हाला खात्री असल्याचे ठाकूर म्हणाल्या. यापूर्वीही मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन इथल्या मावळ्यांवर चाल करून आली होती. आमिष दाखवून आणि भीती दाखवून इथल्या काही मनसबदारांना आणि वतनदारांना मुघलांनी आपल्या बाजूने करुन घेतले होते. देशासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येनं कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला. हे महाराष्ट्र विसरलेला नाही. आगामी निवडणुकीत हे विसरणारही नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. तसेच जनता थारा देणार नाही असेही आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
Ravi Rana: यशोमती ठाकूरही आमच्या संपर्कात, आमदार रवी राणांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ