तळकोकणातील सावंतवाडीमधील लाकडी खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान, देशभरातील बारा हस्तकलांचा समावेश
गेली कित्येक वर्षे सावंतवाडी चितारआळीतील लाकडी खेळणी देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे या लाकडी खेळणी बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक ही लाकडी खेळणी खरेदी करतात.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तयार होणाऱ्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सावंतवाडीतील चितारआळी भागात अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या लाकडाच्या प्रतिकृती बनवल्या जातात. कोकणातील निसर्गरम्य वातावरणामुळे हे आता पर्यटकांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. सावंतवाडीतील जगप्रसिद्ध लाकडी खेळणी आता पोस्ट कार्डवर झळकली आहेत. भारतीय पोस्टाने देशातील बारा हस्तकलांना पोस्टकार्डवर स्थान दिले आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा समावेश आहे. भारतीय पोस्टाच्या दीडशे वर्षाच्या प्रवासानिमित्ताने भारतीय पोस्टाने खास पोस्ट कार्ड काढली आहेत. ही कार्ड आता ग्रीटिंग स्वरुपात पाठवता येणार आहेत.
जागतिक पोस्टकार्ड दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील मुंबई व गोवा येथे नव्या पोस्टकार्डचे प्रकाशन झाले. यावेळी गोवा येथील पोस्ट मास्तर डॉ. एन. विनयकुमार, डॉ. सुधीर जखेरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला. आपल्या देशातील हस्तकलेचा सन्मान व्हावा म्हणून भारतीय पोस्टाने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशची वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेला या पोस्टकार्डमध्ये स्थान दिले आहे. ही पोस्टकार्ड आपण ऑनलाईन सुद्ध बघू शकतो. https://www.debutpex.com/ या वेबसाइटवर पोस्टकार्डांचे ऑनलाइन प्रदर्शन पाहता येणार आहे. महाराष्ट्रात पोस्टकार्डवर सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांनी बाजी मारली आहे.
सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडीतील या लाकडी खेळण्यांना व कारागिरांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शिवरामराजे भोसले यांनीही चितारी कारागिरांना राजाश्रय मिळवून देताना ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. राजमाता कै. सत्वशीलादेवी भोसले यांनीही लाकडी खेळण्यासोबत गंजिफा कलेला नवी ओळख दिली. गेली कित्येक वर्षे सावंतवाडी चितारआळीतील लाकडी खेळणी देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे या लाकडी खेळणी बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक ही लाकडी खेळणी खरेदी करतात.
भारतीय पोस्ट खात्याने महाराष्ट्रातील या कोकणातील सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना वेगळे स्थान मिळवून दिले आहे. या व्यतिरिक्त आंध्रप्रदेशची कोंडापल्ली, एटीकोप्पका खेळणी, गुजरात कच्छ येथील लाकडी खेळणी, हिमाचलमधील हिमाचली बाहुल्या, मध्यप्रदेशची बुधनी खेळणी, ओडिशाची जोखंढेई लाख खेळणी, तामिळनाडूची तंजावूर खेळणी, तेलंगणाची निर्मल खेळणी, कर्नाटकची छन्नपटना आणि उत्तरप्रदेशची मिर्झापूर बनारसी खेळणी यांचे फोटो पोस्टकार्डवर आहेत.
सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळणी कारखानदार व दुकानदार काणेकर यांनी पोस्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत आपल्या लाकडी खेळण्याना पोस्टकार्डवर स्थान मिळाल्याने आपल्या हस्तकलेला मान मिळाल्याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय पोस्टाने प्रकाशित केलेली ही कार्ड आपण मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना भेट स्वरुपात पाठवू शकणार आहे. त्यामुळे ही कला आता देशभर जाणार आहे.
भारतीय पोस्ट ऑफिसने सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान दिले. संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यानी सावंतवाडीतील या लाकडी खेळण्यांना व कारागिरांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. लाकडी खेळणी बनवण्याचे कारखाने उभारल्यास त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतो. मात्र शासनाकडून अनुदान मिळणे तितकंच आवश्यक आहे. सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लाकडी खेळणी बनवण्याचे कारखाने आहेत.
जागतिक पोस्टकार्ड दिनाच्या निमित्ताने या 12 पोस्टकार्डांच्या सेटचे प्रकाशन करण्यात आले. कोकणात पर्यटनाला जाणारे सावंतवाडीची लाकडी खेळणी आवर्जून विकत घेतात. गंजिफा हा खेळही तिथे लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील सावंतवाडीमधील लाकडी खेळणी यांचे फोटो या पोस्टकार्डवर समाविष्ट करण्यात आले आहेत. सावंतवाडीतील लाकडी खेळणी ही साधारणपणे 300 वर्षांपासूनचा इतिहास आहे.
एटिकोप्पा खेळण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोस्टकार्डवर पोस्टाच्या पेटीचेच चित्र आहे. एटिकोप्पा गावामध्ये लाकडी खेळण्यांना लाखेने सजवले जाते. थारिणी कला असेही या कलेला संबोधले जाते. मध्य प्रदेशची बुधनी खेळणी लाकडीच आहेत. ही खेळणी सुमारे 200 वर्षांपासून घडवली जातात. पश्चिम बंगालची घुरणी बाहुल्यांना कृष्णनगरच्या बाहुल्या असेही संबोधले जाते. या बाहुल्या मातीपासून घडवल्या जातात. या बाहुल्यांना 250 वर्षांचा इतिहास आहे. कर्नाटकच्या छन्नपटना खेळण्यांना जीआय टॅग मिळाला आहे. ओडिशाच्या जौखंढेई बाहुल्यांनाही सांस्कृतिक इतिहास आहे. या बाहुल्या वर-वधूच्या रुपात असतात. त्यांना काही सणांदरम्यान पूजले जाते. काही वेळा त्यांच्या लग्नसोहळ्याचा प्रत्यक्ष विधीही पार पडतो. हिमालचली बाहुल्याही लाकडाच्याच घडवल्या जातात. स्थानिक लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या बाहुल्या त्यांच्याप्रमाणेच नाजूक असतात. हिमाचलची संस्कृती दर्शवणारे पोशाख या बाहुल्यांवर कोरलेले असतात. मिर्झापूरी खेळणीही अतिशय देखणी असतात. ही खेळणी एकसंध पद्धतीने, जोड न देता तयार केली जातात. या आणि इतर राज्यातील खेळण्यांचा थोडक्यात आढावा या पोस्टकार्डांवर घेण्यात आला आहे. अनेकदा खेळणी विकत घेताना त्यांचा इतिहास आपल्याला माहित नसतो. ही खेळणी केवळ शोभेच्या वस्तू न राहता इतिहास-भुगोलासह त्याची संस्कृतीही उलगडावी हा त्यामागचा प्रयत्न आहे.