ST Strike : गेल्या 2 महिन्याहून अधिक काळ झालं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. विलिनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम आहेत. अशातच आज अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या महिलांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एसटीचं विलिनीकरण करावे अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिलांनी केली आहे. 


अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला महिलांची मोठी गर्दी आहे. या मार्चामध्ये लहान लहान मुलांना घेऊन महिला सहभागी झाल्या आहेत. जवळपास 500 महिला  कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील सहभागी झाल्या आहेत. रस्त्यावर बसून सरकार विरोधात मोठ्याने घोषणाबाजी देखील सुरू आहे.


जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे मोर्चात सहभागी झालेल्या  महिलांनी सांगितले. गेल्या अडीच महिन्यांपासून आमच्या कुटुंबारवर संकट आले आहे. राज्य सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आमची पगारवाढ झाली नाही तर चालेल, पण आमचे विलिनीकरण झालेच पाहिजे. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही जिजाऊंच्या जयंती दिवशी संप करत आहेत. विलीनीकरणाची आमची मागणी सरकारने मान्य केलेली नाही त्यामुळे संप मिटलेला नाही असे यावेळी महिलांनी सांगितले. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या महिलांनी केली आहे.


मागच्या दोन दिवसाखालीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी संघटनांच्या कृती समितीशी बैठक झाली होती. त्यानंतर कृती समितीच्या विविध सदस्यांनी आपली भूमिका मांडली होती. या बैठकीत आमच्या शंकांचे निरसण झाल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. यावेळी समितीच्या सदस्यांनी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी देखील केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जी  पगारवाढ दिली आहे. त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या सर्व त्रुटी दूर करण्याचे सरकारने मान्य केले आहे. तसेच विलीणीकरणाबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत समिती नेमली आहे, तो समिती जो निर्णय देऊल तो सरकारला मान्य असेल असेही यावेळी समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे. तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामावर रुजू झाल्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देखील मंत्र्यांनी दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. तरीदेखील कर्मचारी संपावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा रस्त्यावर उतरत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. तसेच विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: