यवतमाळ : उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. डॉ. धर्मकारे यांच्यावर काल सायंकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या समोरच गोळीबार झाला होता. घटनेनंतर त्यांना उत्तरवार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. हनुमंत धर्मकारे हे उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सांयकाळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे. डॉ. धर्मकारे यांची प्रकृती चिंताजनक होती. उमरखेड पुसद रोडवर ऊत्तरवार रुग्णालयाच्या सामोरंच ही घटना घडली होती.
डॉ. धर्मकारे हे गेल्या एक महिन्यापासून सुट्टीवर होते. कालच ते कामावर रूजू झाले होते. कामावर रुजू झाल्याची नोंद करून त्यांनी उत्तरवार रूग्णालयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर चहा घेतला. तेथून रूग्णालयाकडे जाण्यासाठी ते त्यांच्या दुचाकीवर बसत होते, त्याच वेळी एका अज्ञात युवकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी त्यांच्या छातीत लागली तर तीन गोळ्या पाठीत लागल्या. आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोराने तेथून पळ काढला. स्थानिकांनी तत्काळ डॉ. धर्मकारे यांना उपचारासाठी ऊत्तरवार रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे रूग्णालयाच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
उमरखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सार्वजनिक समारंभ, शाळा 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्या; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून