मुंबईहून बेळगावला आलेल्या गर्भवती महिलेला कोरोना, पतीसह भाऊ आणि चालकावर गुन्हा
बेळगाव जिल्ह्यात विना परवाना प्रवेश केल्यावर देखील महिलेने आरोग्य खाते आणि संबंधित खात्याला कळवले नाही. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव : मुंबई येथून आठवड्यापूर्वी परतलेल्या बेळगाव (सदाशिव नगर) येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 108 झाली आहे .ही महिला मुंबई ,धारावी येथून एक आठवड्यापूर्वी बेळगावला आली होती. महिलेचा पती, भाऊ आणि वाहन चालकावर एपीएमसी पोलीस स्थानकात परवानगी न घेता प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात विना परवाना प्रवेश केल्यावर देखील आरोग्य खाते आणि संबंधित खात्याला कळवले नाही. परराज्यातून बेकायदा बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
बेळगावला आल्यानंतर ती सात महिन्याची गर्भवती असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. 11 मे रोजी तिचा घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. तो अहवाल आला असून सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तिला जिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात हलविण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही महिला बेळगावच्या सदाशिवनगर येथे राहत होती. तिच्या सोबत घरात अन्य दहा व्यक्ती राहायला होत्या. या दहा जणांना देखील संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईहून आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य खात्याने आणि जिल्हा प्रशासनाने तिच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच ती मुंबईहून आल्यावर तिला भेटायला कोण कोण आले होते याचीही चौकशी करण्यात येत आहे. नवीन नियमांनुसार बेळगावात सदाशिवनगरमध्ये ती महिला राहत असलेल्या घरापासून शंभर मीटर परिघाचा प्रदेश मार्क करण्याचे काम सुरू आहे.
3 मे रोजी ही महिला बेळगावात कारने दाखल झाली. नंतर तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण ती महिला आपले वडील, भाऊ यांच्या बरोबर सकाळच्या वेळी फिरायला जात होती. यावेळी तिने अनेक जणांशी संवाद साधला आहे. याशिवाय तिचे वडील आणि भाऊ यांच्या संपर्कात अनेक लोक आले आहेत. त्यामुळे या महिलेच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या दहा जणांचे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Solapur Birthday Celebration | सोलापूरमध्ये कोरोनाबाधित चिमुरड्यांचा वाढदिवस साजरा, रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांचं पाऊल