काल रात्री झोप लागली का? आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही
Aaditya Thackeray : आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही. त्यांचे पट्टे गेलेत आणि ते आता मांजर झालेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सडकून टिका केली आहे.
Aaditya Thackeray : दिशा सालियनच्या मृत्यूवरुन विरोधकांनी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी (SIT Inquiry) करण्याची मागणी केली आहे. मात्र ऐवढे दिवस गप्प असणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आज पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. एबीपी माझाशी (ABP Majha) बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूच्या दिवशी कुठे होते, यासंदर्भात माहिती दिली आहे.
दिशा सालियानचा मृत्यू (Disha Salian Death Case) ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी रुग्णालयात होतो. आजोबा रुग्णालयात दाखल असल्यानं मी तिथेच होतो, असं एबीपी माझाशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या आरोपांवरुन आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही. त्यांचे पट्टे गेलेत आणि ते आता मांजर झालेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सडकून टिका केली आहे.
तुमच्यावर जे आरोप होतायत, एक डाग लागलाय, त्यामुळे रात्री झोप लागली का? या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे बोलले की, "डाग नाही, शाईला ते घाबरतात आम्ही नाही घाबरत. आम्ही पट्टेरीच वाघ आहोत. त्यांचे पट्टे गेलेत आणि ते आता मांजर झालेत. डाग नाही आमचे पट्टे आहेत, वाघाचे... ते दाखवतो. महत्त्वाची गोष्ट हिच आहे, यांचं बदनामी करण्याचं षडयंत्र आहे. त्यांची कट हाच आहे. बदनामी करायची, त्यात अर्धा दिवस बातम्या चालतील. दुपारच्या सत्रात जयंत पाटलांचं निलंबन करायचं, मग त्यावर बातम्या चालतील. यामागे एकच लपलं जाईल, ते म्हणजे, मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आणि एनआयटी. आम्ही सतत राज्यपालांनी जो छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, त्यावर बोलत राहू. मुख्यमंत्र्यांचा जो घोटाळा आहे, त्यासंदर्भात राजीनामा देईपर्यंत आम्ही बोलत राहू. त्यानंतरही कारवाई होईपर्यंत आम्ही लोकांसमोर हे सत्य आणत राहू."
पाहा व्हिडीओ : Aaditya Thackeray on Shinde Group : आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही, ते मांजर झालेत
ठाकरे गटाचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "मुखवटे फाडून आता खरे चेहरे समोर आले आहेत. मला लाज वाटतेय की, ते कधीकाळी आमच्यासोबत होते. आम्हाला लाज वाटायला लागलीये आणि खरा चेहरा समोर येतोय. बरं झालं ते तिथे गेले, त्यांचा खरा चेहरा दाखवतायत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे, ती आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रासाठी लढतेय. कालच्या सभागृहाचं चित्र पाहा, जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो, तेव्हा आमचे विषय कोणते होते? महाराष्ट्रात गुंतवणूक आणत होतो. रोजगार वाढवत होतो. कर्नाटकाच्या विरोधात बोलत होतो. ताकद आणि हिंमत महाराष्ट्राची दिसत होती. पण आता कर्नाटकावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे विषय घ्यायला तयार नाही, आम्ही जी कर्जमुक्ती केली, त्यातला एक रुपया यांनी अजून दिलेला नाही. एक गद्दार मंत्री सुप्रीया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. अद्याप पश्चाताप नाही, माफी मागितली नाही, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एक गद्दार असे आहेत, त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर गणपती मिरवणुकीत जाऊन गोळीबार केला. हे यांचं हिंदुत्व."
"परवा एक सत्ताधारी पक्षातले एक आमदार छगन भुजबळांना म्हणाले की, डोक्यावर परिणाम झालाय. त्यावर मी आवाज उठवला तर संपूर्ण सत्ताधारी पक्ष माझ्या अंगावर आला. ही कोणती पातळी झाली. एकंदरीतच संपूर्ण एकतर्फी कारभार हा सभागृहात सुरू आहे. अज्ञाय आमच्यावर सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या नागपुरात NIT चा घोटाळा झालाय, गैरवर्तन झालंय. परवापासून जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, भास्कर जाधव बोलण्याचा प्रयत्न करतायत. कुठेही आम्हाला बोलू दिलं जात नाही. शेतकऱ्यांसंदर्भात आम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय. बोलू दिलं जात नाही. मग कशाला आत जायचं?", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Aaditya Thackeray Disha Salian :दिशाच्या मृत्यूच्या दिवशी कुठे होतात? आदित्य पहिल्यांदाच बोलले
दिशा सालियनच्या (Disha Salian) आत्महत्या प्रकरणात शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून लक्ष्य करण्यात येत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thakceray) यांनी दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Suicide Case) प्रकरणात आपले मौन सोडले आहे. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आजोबा (रश्मी ठाकरे यांचे वडील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.