Sanjay Rathod : एकनाथ शिंदे गटासाठी संजय राठोड महत्वाचे का ?
Sanjay Rathod : यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस-नेर मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी मंगळवारी शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
Sanjay Rathod : यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस-नेर मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी मंगळवारी शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने राठोड यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यांनी आता पुन्हा एकदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे गटासाठी संजय राठोड महत्वाचे का आहेत? हे जाणून घेऊयात...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर जे काही नेते बंजारा समाजाला आपले वाटतात त्यापैकी संजय राठोड एक आहेत. संजय राठोड स्वत: त्यांच्या दिग्रस मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. मागील तीन टर्ममध्ये 50 टक्केंहून अधिक मतं मिळवत आहेत. त्यातही गेली दोन टर्म त्यांनी 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. भावना गवळी यांच्या निवडून येण्यात बंजारा समाजाचं मतदान निर्णायक ठरत आलं आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेत बंजारा समाजाचं किमान पाच लाख मतदान आहे. तिथे गेली पाच टर्म शिवसेनेला संजय राठोड यांचा फायदा होतोय. यावरुन राठोड किती आणि का महत्वाचे ते लक्षात येईल.
संजय राठोड पहिल्यांदा 2004 साली दारव्हा मतदारसंघातून विधानसभेवर गेले. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना 21 हजार 542 मतांनी हरवलं होतं. संजय राठोड यांना 68 हजार 586 मतं तर माणिकराव ठाकरेंना 47 हजार 44 मतं पडली होती. 2009 पासून सलग तीन टर्म संजय राठोड दिग्रस मतदारसंघातून निवडून येत आहेत. 2009 साली एकूण एक लाख 92 हजार 384 मतदान झालं, त्यापैकी 54.13 टक्के म्हणजे 1 लाख चार हजार 134 मतं संजय राठोड यांना पडली. तबब्ल 54 हजार 145 मताधिक्याने राठोड यांनी काँग्रेस उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव केला होता.
2014 साली मोदी लाट होती, सेना-भाजप युती तुटली होती. तरीही दोन लाख 846 मतांपैकी संजय राठोड यांनी तब्बल 60.10 % म्हणजे एक लाख 21 हजार 216 मतं मिळवली. राष्ट्रवादी उमेदवाराला 41 हजार 352 मतं पडली. राठोड तब्बल 79 हजार 864 मताधिक्याने विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराला फक्त 10,902 मतं पडली होती. 2019 साली दोन लाख 26 हजार 259 मतांपैकी संजय राठोड यांनी पुन्हा 60 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लाख 36 हजार 823 मतं मिळवली तर अपक्ष लढणाऱ्या संजय देशमुख यांना 73 हजार 217 मतं मिळाली. संजय राठोड 63 हजार 606 मतांनी विजयी झाले.