Soldiers suicide | नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात जवान आत्महत्या का करत आहेत?
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याशी दोन हात करण्यासाठी तैनात असणारे जवान आत्महत्या का करत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, कोरोनाच्या काळात एक अधिकारी आणि दोन जवानांनी आपले जीवन संपवलंय.
गडचिरोली : नक्षलग्रस्त, आदिवासी आणि मागासलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. मात्र, या जिल्ह्यात नक्षलवाद हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे नक्षल्यांशी सामना करण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा पोलीस -एसआरपीएफ व्यतिरिक्त निमलष्करी दल सिआरपीएफ देखील तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मागील वर्षांच्या तुलनेत नक्षली कारवायांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या काळात एप्रिल आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात तैनात असलेल्या एक अधिकारी आणि दोन जवानांनी आत्महत्या केली आहे.
एकीकडे कोरोना तर दुसरीकडे नक्षलवाद या दोघांसोबत सुरू असलेल्या युद्धात जवानांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे का? की त्यांना वेळेवर सुट्या मिळत नाही? हा संशोधनाचा विषय आहे. जवानांनी आत्महत्या करण्याआधी पत्र लिहिले होत की आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. यात आजारपणाचे कारण असले तरी खरं तर नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करणे इतके सोपे नाही. जिल्ह्यात काम करत असताना घरच्यांची चिंता, वेळेवर न मिळणारी सुट्टी, आर्थिक संकट, रात्रंदिवस ऑन ड्युटी तैनात असणे, त्यात कोरोनाचा महासंकट, लॉकडाऊन अशी अनेक कारणं आहेत. त्यामुळे मानसिक ताण येणे साहाजिक आहे.
गडचिरोलीत गरोदर मातेची 23 किमी पायपीट, प्रसुतीसाठी नदी नाल्यातून प्रवास
ह्या नैराश्यातूनच आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलत असल्याची माहिती आता पुढे येत असली तरी याची खंबीर दखल घेणे गरजेचे आहे. या संपूर्ण विषयावर पोलीस विभाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यावर बोलण्यास नकार दिला.
कधी आणि कुणी केली आत्महत्या
- 23 एप्रिल 2020 धानोरा तालुक्यातील सावरगाव येथील पोलीस मदत केंद्रात एसआरपीएफचे चंद्रकांत शिंदे या पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांनी दीर्घ आजाराने आत्महत्या केल्याचं पत्रात लिहिलं होतं.
- 26 एप्रिल 2020 भामरागड तालुक्यातील महाराष्ट्रच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी पोलीस मदत केंद्रात दीपक कुमार या सिआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आजारपणामुळे आत्महत्या करत असल्याचं पत्रात लिहले आहे.
- 7 जुलै 2020 गडचिरोली येथे कार्यरत एसडीपीओचे वाहन चालक मदन गौरकार यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. घरगुती वाद आर्थिक संकट यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
- नक्षल्यांना कंठस्नान घालणारे गडचिरोलीचे शूर जवान इतकं टोकाचं पाऊल उचलून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या का करत आहे. या मागचं नेमके कारण आहे, याचा तपास होणे आता गरजेचे आहे.