बेळगावमध्ये का साजरा केला जातो हुतात्मा दिन? 17 जानेवारी 1956 ला नेमकं काय घडलं होतं?
सीमालढ्याच्या इतिहासात 17 जानेवारी 1956 रोजी एक महत्त्वाची घटना घडली होती. याच दिवशी केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आणि.....
बेळगाव : गेल्या 65 वर्षांपासून सुरु असलेल्या सीमालढ्याच्या इतिहासात 17 जानेवारी या दिवसाला महत्व आहे. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावमध्ये सीमालढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या पाच आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मे झाले. त्यामुळे आजचा दिवस हा सीमाभागात हुतात्मा दिवस साजरा केला जातो.
हुतात्मा दिनाचा इतिहास काय आहे?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मीती झाली खरं, पण याच वेळी बेळगाव, कारवार, बिदर सह मराठी भाषकांचा सीमाभाग हा कर्नाटकाला जोडण्यात आला. सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अग्रेसर असलेल्या बेळगावातील जनतेला आजही त्यांच्या हक्कांसाठी, मागणीसाठी लढा द्यावा लागत आहे. बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात या विरोधात मोठं आंदोलन झालं. या आदोलनाच्या वेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी एक अशा पाच हुतात्म्यांना पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडावं लागलं होतं.
भाषावार प्रांतरचनेचा इतिहास काय आहे?
भारतात भाषावार प्रांतरचनेचा इतिहास हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1920 साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या विशेष आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा मांडला होता आणि तो मान्य करुन घेतला होता.
स्वातंत्र्यानंतर भाषावार राज्यांची मागणी होऊ लागली. यामध्ये सर्वप्रथम 1953 साली आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. याच धर्तीवर संपूर्ण मराठी राज्याची निर्मिती करावी अशी मागणी महाराष्ट्रातून होत होती. अशीच मागणी देशातील इतरही भागांतून होत होती. त्यामुळे 1953 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली. या आयोगात फाजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि एम. के. पणिकर असे तिघेजण होते.
भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी जाहीर केलं. या आयोगाने केलेल्या सूचनेमध्ये मुंबई द्वैभाषिक राज्य करण्याची सूचना होती. तर बेळगावसह संपूर्ण सीमाभाग त्या वेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सीमाभागातील मराठी जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला. त्याचे पडसाद हे बेळगावमध्ये उमटू लागले. 17 जानेवारी 1956 रोजी सकाळपासूनच व्यापारी पेठा ठप्प झाल्या. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर येऊ लागले आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊ लागले.
रस्त्यावर उतरलेला जमाव केंद्र सरकारच्या विरोधात जास्तच आक्रमक झाला होता. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी म्हैसूर प्रांतातील पोलिसांना गोळीबाराचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या या गोळीबारात चार जण आंदोलक हुतात्मे झाले. तर दुसऱ्या दिवशी निपाणीत एक महिला पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे 107 हुतात्मे झाले त्यापैकी पाच हुतात्मे हे बेळगाव जिल्ह्यातील या घटनेमधील आहेत. तेव्हापासून 17 जानेवारी हा दिवस सीमाभागात हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सीमालढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.
बेळगावसह सीमाभागातील जनतेने हा सीमालढा गेल्या 65 वर्षांपासून धगधगता ठेवला आहे. आजही या भागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे.