ओल्या दुष्काळाचे बळी! डोळ्यासमोर पिकांची माती झालेली पाहून लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
पावसामुळं शेतातीलं पिक डोळ्यासमोर वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. यातूनचं लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
लातूर : यावर्षी कधी नव्हे ते पावसानं उत्तम साथ दिली, पिकंही जोमदार आली. मात्र, शेतमाल काढणीच्या वेळीच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली अन् अवघ्या काही तासांत होत्याचं नव्हतं करुन टाकलं. हातातोंडातला घास या पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने काढलेलं पिक डोळ्यासमोर वाहून जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यातूनचं दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी परमेश्वर नागनाथ बिरादार (वय 34) यांनी विहिरित उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. शेती कमी असल्याने कुटुंबातील सदस्य लातुरला मोलमजूरी करत होते. तर परमेश्वर घरची शेती पहात होता. यावर्षी सोयाबीन चांगले आले होते. पिकाची काढणी देखील झाली होती. त्याच दिवशी तुफान पाऊस झाला आणि काढलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. यामुळे मानसीकरित्या खचलेला परमेश्वर दोन दिवसांपासून घरातून गायब होता. रात्री उशिरा त्याचा मृतदेह विहिरित सापडला. औराद शाहजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सदस्यांचा रोजगार केला होता. अशात आता शेतीतलं उत्पन्नही पाण्यात गेल्याने तो निराश होता अशी माहिती दिली आहे.
पंढरपुराला पुराचा विळखा; 3305 घरांत शिरले पाणी, शेकडो वाहने अडकली
दुसरी घटना उदगीर तालुक्यातील..
उदगीर तालुक्यातील वाढवना खुर्द येथील गोपीनाथ ग्यानोबा मद्देवाड (वय 68) यांना तीन एकर शेती आहे. यावरच त्यांच्या घराची रोजीरोटी चालते. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने त्यांचा घात केला. लोकांची देणी कशी द्यावी? कारण हातात आलेले पिक पावसानं हिरावलं. यामुळे शेतातील झाडाला गळफांस घेत त्यानी जीवनयात्रा संपवली आहे. या बाबत वाढवना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra Rains | मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर; शेतीचं नुकसान, बळीराजा चिंतेत