El Nino: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! एल निनोचा प्रभाव कमी होणार; यंदा देशात सरासरी 94 टक्के पावसाची शक्यता
Weather El Nino Impact: प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होत असल्याने देशात सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 94 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता अमेरीकी हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे
Monsoon Update News : शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा (El Nino) प्रभाव कमी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनोचा (El Nino) प्रभाव कमी होण्याची शक्यता अमेरीकी हवामान संस्थेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 94 टक्के पावसाची (Rain) नोंद होण्याची शक्यताही अमेरिकेतील हवामान विभागाने वतीने वर्तवली आहे. मात्र, या बाबत भारतीय हवामान विभाग (IMD) काय भाष्य करते हे पाहणे महत्वाचे ठरणार असले तरी, या बातमीमुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांची चिंता काही अंशी का होईना मिटल्याचे बघायला मिळत आहे.
देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज
पुढील महिन्यापासून प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होईल अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र हवामानाची स्थिति न्यूट्रल होणाची दाट शक्यता आहे. परिणामी देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद होणार असल्याची देखील माहिती अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. जगभरात जेव्हा जेव्हा एल निनोची स्थिती ही सामान्य राहते, तेव्हा देशात चांगला पाऊस झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर मान्सूनच्या शेवटाला एल निनोचा प्रभाव अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे देशात आणि राज्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती.
मात्र, आगामी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाची चांगली परिस्थिती बघायला मिळणार असल्याने देशातील शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भारतीय हवामान विभाग याविषयी काय भाष्य करते हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र एकीकडे जागतिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली ही स्थिती शेतकऱ्यांसाठी काही अंशी दिलासादायक ठरणार आहे.
एल निनो म्हणजे काय?
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जात तेव्हा त्याला एल निनो असं म्हटलं जातं. प्रशांत महासागराचं सरासरी तापमानापेक्षा तापमान 0.5 अंश अधिक झाल्यास एल निनोची परिस्थिती निर्माण होते. तापमान 0.5 अंशापेक्षा अधिक झाल्यास जगभरातील वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे हवामानातही बदल दिसून येतो.
एल निनोचा वातावरणावर परिणाम
एल निनोमुळे मान्सून काळात बाष्प कमी होतं आणि त्यामुळे मान्सून कमी होतो. याचा परिणाम आधीही आपल्याला दिसून आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाला. पण, आता एल निनोची स्थिती जाऊन तापमान सर्वसाधारण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही आगामी मान्सूनसाठी दिलासादायक बाब असून राज्यात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या