मुंबई : राज्यात यंदा अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने अनेक छोटे मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागात शासकीय आणि खासगी टँकरने (Tanker) पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील तब्बल 2 हजार 195 गाव आणि वाड्यांवर 481 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 432 गावं आणि 1767 वाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 97 टँकर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात सुरू असल्याचे समोर आले आहेत. तर मागील आठवड्यात राज्यात सुरू असलेल्या टँकरचा आकडा 468 होता. मात्र, आठवड्याभरात 13 टँकरची भर पडली आहे.
पुणे विभागात सर्वाधिक टँकर
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना सरकारकडून अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, सर्वाधिक 200 टँकर पुणे विभागात सुरू आहे. ज्यात, पुणे जिल्ह्यातील एकूण 40 गावं आणि 289 वाड्यांवर 51 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सातारा जिल्ह्यात 97, सांगली 37 आणि सोलापूर जिल्ह्यात 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागात एकूण 175 गावं आणि 1114 वाड्यांवर पाणी प्रश्न गंभीर बनल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू?
जिल्ह्याचे नाव | एकूण टँकर |
नाशिक | 81 |
धुळे | 01 |
जळगांव | 17 |
अहमदनगर | 86 |
पुणे | 51 |
सातारा | 97 |
सांगली | 37 |
सोलापूर | 15 |
छत्रपती संभाजीनगर | 59 |
जालना | 36 |
बुलढाणा | 01 |
यवतमाळ | 01 |
एकूण | 481 |
टँकरसाठी पाणी आणायचं कुठून?
राज्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा योजना पाण्याच्या स्त्रोत संपल्याने बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी तलाव, धरणे कोरडेठाक पडली आहेत. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी देखील आटल्या आहेत. त्यामुळे गावातील इतर खासगी विहिरीचे अधिग्रहण करून, किंवा परिसरात इतर धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पाऊस न पडल्यास सध्या आहे ते देखील पाण्याचे स्त्रोत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात टँकरसाठी पाणी आणायचं कुठून? असाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
टँकर लॉबी सक्रीय होण्याची शक्यता?
यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळात अनेकदा टँकर लॉबी सक्रीय होतांना पाहायला मिळाले. पाणी संकट असतांना अनेकदा टँकरची मागणी वाढते. गाव आणि तांड्या, वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचे प्रस्ताव येत असतात. त्यामुळे याच परिस्थितीचा काही लोकं फायदा घेतात. अनेकदा राजकीय नेत्यांना टँकरचे कंत्राट मिळतात. तर, अनेक नेत्यांचे टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी भाडेतत्वावर लावण्यात येतात. अशात काही लोकं शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचारी यांना हाताशी धरून टँकर घोटाळा करतात. पाण्याच्या खेपा अधिक लावणे, टँकरच्या फेऱ्या कमी असतांना अधिक दाखवणे, जीपीएस न लावता खोट्या नोंदी करणे, पाणी खाजगी लोकांना विकणे असे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. यंदा देखील पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास टँकरची मागणी वाढू शकते. त्यामुळे अशावेळी टँकर लॉबी देखील सक्रीय होण्याची शक्यता असते.
इतर महत्वाच्या बातम्या: