छत्रपती संभाजी नगर : पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अशातच मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 96.87 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात यंदा फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. 


नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्यास तेथील धरणे भरल्यावर खाली गोदावरीच्या माध्यमातून पाणी जायकवाडी धरणात सोडले जाते. मात्र, यंदा नाशिक भागात जोरदार असा पाऊस झालाच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणात पाणी आलेच नाही. अशा परिस्थितीत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. आता पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले असून, जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे 1 जूनपासून आतापर्यंत 326.7490 दलघमी पाण्याची धरणात आवक झाली असून, ही आवक किंचित असल्याचे सांगितले जात आहे. 


जायकवाडी धरणातील पाणीसाठा (20 सप्टेंबर 2023)   



  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1506.81 फूट 

  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.274 मीटर 

  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1454.612 दलघमी

  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 716.506 दलघमी

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.00 टक्के 

  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक :  00 

  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.967 

  • उजवा कालवा विसर्ग :900 क्युसेक 

  • डावा कालवा विसर्ग : 1500 क्युसेक 


मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा 



  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2102.878 दलघमी

  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 96.87 टक्के 

  • 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 326.7490 दलघमी 

  • 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.410 दलघमी


नियोजन करण्याची गरज


जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. सोबतच बीड, नांदेडसह इतर जिल्ह्यांना शेतीसाठी पाणी पुरवले जाते. सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग शेतीसाठी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे धरणात सध्या असलेला पाणीसाठा आणि पावसाची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा पुढील काळात पाऊस न झाल्यास पाण्याचा प्रश्न आणखीच गंभीर होऊ शकतो. विशेष म्हणजे आजच अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada : मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव; तब्बल 8 हजार 60 पशुपालकांची मोफत बियाण्यांसाठी अर्ज