(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rains Updates : पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावासाचा इशारा
पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई : राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईसाठी आज रेड अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी आज रेड अलर्ट, तर उद्यासाठी ऑरेंज अलर्ट म्हणजे आज 24 तासात काही ठिकाणी 210 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज तर उद्या 100-200 मिमी पावसाचे प्रमाण राहणार आहे. वारे वेगाने वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील बंदरांना सतर्कतेचा इशारा
वादळामुळे बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छमिारांनी समुद्रात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. चोवीस तासात पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापुरातल्या घाट क्षेत्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता
मराठवाड्यात देखील पुढील 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार असून त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.