वर्धा : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच सगळीकडे चर्चा आहे ती फक्त कोरोनाचीच. त्यासाठी देशभरात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. पण तरिही दररोज नवे रुग्ण सापडतच आहेत. कोरोना हा विषाणू नष्ट होणार नसून आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे. आपल्याला कोरोना होणार नाही, असा समज ठेवत कुणी राहू नये, असं मत वर्ध्याच्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक तथा अभ्यासक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी व्यक्त केलं आहे.
देशात दरवर्षी 96 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी 25 लाख मृत्यू संसर्गजन्य आजाराने होतात. यातील जवळपास 3 लाख 75 हजार मृत्यू श्वसनाच्या आजाराने होतात. यंदा कोविडची त्यात भर पडली आहे. टीबीने दरवर्षी चार लाखाच्या घरात मृत्यू होतात. पण याची कुठेही चर्चा होत नाही. किंबहुना भीती सुद्धा नाही. यामुळे कोविडचा विषय अधिक चर्चिला जात असताना इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी आशा डॉक्टर खांडेकर यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना डॉक्टर खांडेकर म्हणाले की, 'कोविड-19 हा जवळपास सातवा कोरोना विषाणू आहे. यापूर्वी असे सहा कोरोना विषाणू येऊन गेलेत. हे सहाही विषाणू आपल्या सोबत आजही आहेत. श्वसनजन्य विषाणू कुठलाही असो डब्लूएचओच्या गाईडलाईन सारख्याच असतात. एच1 एन1 ची साथ आली असताना देखील क्वॉरंटाईन, सोशल डिस्टन्सिंग, पीपीइ, मास्क वापराण्याच्या गाईडलाईन सांगितल्या होत्या. त्यावेळी इतका प्रभाव पडला नव्हता. एच1 एन1 वेळीदेखील मृत्यूदरचा आकडा मोठा सांगितला होता. त्यावेळी अँटीबॉडी सर्वेक्षणात 30 कोटींच्यावर लोकांना नकळत लागण होऊन ते बरे झाले होते. अँटीबॉडी सर्व्हेनंतर त्याचा मृत्यूदर 0.02 टक्के निघाला होता. कोरोनाचेही आकडे अँटीबॉडी सर्व्हेतून जेव्हा पुढे येतील त्यावेळी सुद्धा असेच आकडे पुढे येतील. न्यूयॉर्कमध्ये असा सर्व्हे झाला असता 17 लाख लोकांना कोरोनाची नकळत लागण होऊन ते बरेही झाले होते.'
पाहा व्हिडीओ : कोरोनावरील लशीची जुलैमध्ये अंतिम चाचणी, 'मॉडर्ना'चं संशोधन अखेरच्या टप्प्यात
सोशल डिस्टन्सिंगकरिता लॉकडाऊन केलं जातं. पण त्यामुळे कोरोना नष्ट होणार नाही. तो आपल्यासोबत बराच काळ राहील. त्यामुळे कोरोना जाईल, असं वाटणं म्हणजे, ही भोळी आशा बाळगणं होय. तसेच, योग्य आवरणातील निर्जंतुक केलेल्या मृतदेहापासून धोका नाही, असंही डॉक्टर खांडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
'60 ते 70 टक्के लोकांना याची लागण होईल, असं तज्ज्ञ सांगतात. बऱ्याच लोकांना लक्षणं दिसून येणार नाहीत. काही लोकांमध्ये खूप कमी लक्षण दिसतील. अनेकांना दवाखाण्यात जाण्याची गरजही भासणार नाही. गंभीर लक्षणं असलेल्यांना मात्र आरोग्य सुविधा मिळणं गरजेचं आहे.' असं डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले.
'इटलीत मागील वर्षी हिवाळ्यात एच1 एन1 मुळे 34 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. युएसएमध्ये 80 ते 81 हजार नागरिकाचा मृत्यू झाला. हा आकडा कमी नाही. आपल्याला दिलेल्या सुचनांच पालन करावं, पण आपल्याला लागण होणार नाही, या भ्रमात कोणी राहू नये. प्रत्येकाने रोगप्रतिकारक्षमता वाढवावी, योग्य तो आहार घ्यावा. ताण कमी असावा. झोप व्यवस्थित घ्यावी. व्यायाम करावा, असं आवाहन डॉक्टर खांडेकर यांनी केलं आहे.
कोण आहेत डॉ. इंद्रजित खांडेकर ?
डॉक्टर खांडेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलांसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. डॉक्टर खांडेकर यांनी कौमार्य चाचणी (टू फिंगर टेस्ट) अमानवीय असल्याच निदर्शनास आणल होत. त्यानंतर ही चाचणी वैद्यकीय अभ्यासक्रमातून बाद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता, अशी चाचणी डॉक्टरांनी करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. ज्या प्रकरणात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूच कारण दिलं आहे, अशा प्रकरणात परत कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाऊ नये, अशी मागणी सरकारकडे केली होती. पोलीस विभागाच्या पुढाकाराने वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात हा प्रोजेक्ट राबवला जात आहे. डॉक्टरांचे हस्ताक्षर, शवविच्छेदन अहवाल, एमबाबीएस अभ्यासक्रमातील बदल आदींवरही केलेले काम मोलाचे ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गत वर्षीच्या तुलनेत सोलापुरात एकूण मृत्यूचे प्रमाण कमीच : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
N95 मास्कचा काळाबाजार! तीन महिन्यांत मास्कची किंमत तब्बल 250 टक्क्यांनी वाढली
पोलिसांना उपचार मिळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून कोविड सेंटरची उभारणी